मुंबई : एसटी संपामुळे महामंडळाला २२०० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. आता एसटीचे कर्मचारी कामावर रुजू होत आहे. मात्र, कंत्राटी कामगारांच्या मदतीने एसटीच्या फेऱ्या मार्गस्थ होत आहेत. मात्र, खासगी चालक एसटीमध्ये बेकायदा जादा प्रवासी भरत आहेत. या प्रवाशांकडून तिकिटापेक्षा कमी रक्कम घेऊन त्यांच्या तिकिटाचे पैसे स्वतःच्या खिशात घालत आहेत.
खासगी चालक एसटीच्या उत्पन्नावर डल्ला मारत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात दोषी आढळलेल्या चालक व वाहकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित पुरवठादारांकडून झालेल्या नुकसानीच्या भरपाईचे आदेश महामंडळाने दिले आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई-पुणे, सातारा, कोल्हापूर या मार्गावर प्रवासी असून देखील उत्पन्न कमी येत असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे तपासणी पथकांद्वारे खासगी चालक व विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे.