Join us

मोनो स्थानके शौचालयांविना

By admin | Published: December 10, 2015 2:14 AM

सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च करून एमएमआरडीएने मुंबईकरांच्या सेवेत मोनो रेल्वे दाखल केली. परदेशातील स्थानकांप्रमाणेच मुंबई मोनोची रेल्वे स्थानके चकाचक आहेत

समीर कर्णुक,  मुंबईसुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च करून एमएमआरडीएने मुंबईकरांच्या सेवेत मोनो रेल्वे दाखल केली. परदेशातील स्थानकांप्रमाणेच मुंबई मोनोची रेल्वे स्थानके चकाचक आहेत. मात्र प्रवाशांसाठी या स्थानकांमध्ये शौचालयांची सुविधा नसल्याने त्यांना स्थानकांबाहेर येऊन शौचालये शोधावी लागत आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चूनही एमएमआरडीएने केवळ हा दिखावाच केला की काय, असा सवाल आता मोनो प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.२ फेब्रुवारी २०१४ पासून मोनो रेल्वे मुंबईकरांच्या सेवेत हजर झाली. देशातील मोनोचा हा पहिलाच प्रकल्प असल्याने काही दिवस मोनोत प्रवाशांची मोठी गर्दी होती. मात्र त्यानंतर ही गर्दी ओसरू लागली. सध्या केवळ वाशी नाका, माहुल गाव आणि वडाळा येथील रहिवाशीच मोनोने प्रवास करतात. मोनोची वडाळा, भक्तीपार्क, मैसूर कॉलनी, बीपीसीएल, फर्टिलायझर टाऊनशिप, व्ही.एन.पी. जंक्शन आणि चेंबूर अशी सात स्थानके आहेत. हा मार्ग ८.९३ किलोमीटरचा आहे. यासाठी एमएमआरडीएने सुमारे तीन हजार रुपये खर्च केले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जिने, लिफ्टचीदेखील येथे सोय आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी २८ कर्मचारी दिवस-रात्र या रेल्वे स्थानकांवर कार्यरत असतात. यासाठीदेखील महिन्याला कोट्यवधी रुपये खर्च होतात. मात्र एवढे पैसे खर्च करूनही एमएमआरडीएने प्रवाशांसाठी मोनो रेल्वे स्थानकांवर एकही शौचालय बांधलेले नाही. काही मोनो स्थानकांच्या परिसरात तर सार्वजनिक शौचालयेही नाहीत. मधुमेहाचे रुग्ण आणि गर्भवतींची यामुळे मोठी गैरसोय होते. मोनो स्थानकांत शौचालये नसल्याने आता प्रवासी मोनोने प्रवास करणे टाळू लागले आहेत. एमएमआरडीएने तत्काळ शौचालयांची सुविधा द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.