करोडो रुपये खर्च करूनही हॉटेल वापराविना
By admin | Published: April 5, 2015 10:10 PM2015-04-05T22:10:03+5:302015-04-05T22:10:03+5:30
नगरपरिषद स्वायत्त बनवण्यासाठी शासनाकडून करोडो रुपये प्राप्त होवून अपार्टमेंट हॉटेलची निर्मिती २००६ मध्ये करण्यात आली.
नांदगाव : नगरपरिषद स्वायत्त बनवण्यासाठी शासनाकडून करोडो रुपये प्राप्त होवून अपार्टमेंट हॉटेलची निर्मिती २००६ मध्ये करण्यात आली. हॉटेल पूर्ण होवून पर्यटकांसाठी सुसज्ज बनले आहे, परंतु हे हॉटेल २००६ पासून बंदच आहे. सलग ९ वर्षे हॉटेल बंद राहिल्यामुळे येथे वृक्षांची घनदाट दाटी तयार झाली आहे.
मोठ्या वृक्षांनी या हॉटेलवर मोठी सावली तयार केली आहे. नऊ वर्षे हे हॉटेल बंद स्थितीत का? याबाबत माहिती मिळविली असता असे कळते की, या हॉटेलसाठी सीआरझेडसाठी परवानगी मिळालेली नाही, तसेच नगरविकास खात्याकडून हॉटेल लिजवर देण्याबाबतची परवानगीचे कामही प्रलंबित आहे. या सर्व बाबींमुळे हॉटेल बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु यासंदर्भात नगरसेवकांनी पाठपुरावा करून हे प्रकरण तडीस न्यावे अशी शहरी नागरिकांची मागणी आहे.
सलग नऊ वर्षे हॉटेल बंद असल्याने नगरपरिषदेचे कोट्यवधीचे उत्पन्न बुडाले आहे. अपार्टमेंट हॉटेल सुरू होण्यासाठी सर्व नगरसेवकांनी प्रयत्न करावेत अशी स्थानिक जनतेची मागणी आहे.
घर तयार आहे पण घरात राहण्यास कोण जात नाही, अशी रायगड जिल्ह्यातील मुरुड नगरपरिषदेचे एकमेव अपार्टमेंट हॉटेलचे उदाहरण शोधून सापडणार नाही. येथे पर्यटनाचा वेगाने विकास होत असताना हॉटेलची बंदावस्था तोट्याची ठरलेली आहे. आज जर या इमारतीचा वापर झाला असता तर मुरुड नगरपरिषदेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली असती. करोडो रुपये खर्च करून सुद्धा हे हॉटेल धूळ खात पडले आहे. ही शोकांतिका या नगरपरिषदेस निश्चितच भूषणावह नाही. (वार्ताहर)