मुंबई हल्ला प्रकरणातील साक्षीदाराला मिळेना घर; देविकाची पुन्हा न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2022 10:38 AM2022-08-05T10:38:57+5:302022-08-05T10:39:13+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातून वाचलेली आणि या घटनेतील वयाने सर्वात लहान असलेली साक्षीदार देविका रोटावान ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातून वाचलेली आणि या घटनेतील वयाने सर्वात लहान असलेली साक्षीदार देविका रोटावान हिने राज्य सरकारकडून घर मिळविण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. घर मिळविण्यासाठी रोटावानने सरकारकडे अर्ज केला होता. परंतु, सरकारने तिचा अर्ज फेटाळला.
घरासाठी देविकाने दुसऱ्यांदा उच्च न्यायालयात धाव घेतली. २०२०मध्येही तिने अशाच प्रकारचा अर्ज उच्च न्यायालयात केला होता. गुरुवारी न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी न्यायालयाला सांगितले की, न्यायालयाच्या ऑक्टोबर, २०२०च्या आदेशानुसार देविकाला १३.२६ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात आले. तर केंद्र सरकारच्यावतीने ॲड. एन. बुबना यांनी न्यायालयाला सांगितले की, मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यावर सरकारच्या धोरणानुसार देविकाला १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
देविकाचे वकील उपस्थित नसल्याने न्यायालयाने तिच्या याचिकेवरील सुनावणी १२ ऑक्टोबर रोजी ठेवली. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी देविका ९ वर्षांची होती. देविकाने याचिकेत म्हटले आहे की, तिच्या पायाला गोळी लागली होती. तसेच हल्ल्यात वडील व भावालाही जखमा झाल्यामुळे ते कमावण्यासाठी घराबाहेर पडू शकत नाहीत. मी व कुटुंब गरिबीत जगत आहे. घरभाडे न भरल्यास मला बेघर करण्यात येईल.
हल्ल्यानंतर देविकाच्या घरी राज्य व केंद्र सरकारचे अनेक अधिकारी येऊन गेले व आर्थिक मागासवर्ग प्रवर्गातून घर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच शिक्षणाकरिता व कुटुंबियांना उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.
मात्र, कोणतीही मदत करण्यात आली नाही, असे देविकाने याचिकेत म्हटले आहे.