Join us

इतिहासाचे साक्षीदार पुन्हा डौलात उभे राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 7:19 AM

काँक्रीटच्या जंगलात मुंबईची ओळख असलेले मैलाचे दगड बहुतांशी ठिकाणी जमिनीत गाडले गेले आहेत. मात्र, मुंबईतील पुरातन वास्तूंना पुनर्स्थापित करण्याचे धोरण महापालिकेने अवलंबले आहे.

- शेफाली परब - पंडित मुंबई : काँक्रीटच्या जंगलात मुंबईची ओळख असलेले मैलाचे दगड बहुतांशी ठिकाणी जमिनीत गाडले गेले आहेत. मात्र, मुंबईतील पुरातन वास्तूंना पुनर्स्थापित करण्याचे धोरण महापालिकेने अवलंबले आहे. या उपक्रमांतर्गत दोनशे वर्षांपूर्वीच्या मुंबईतील प्रवासाचे साक्षीदार असलेले मैलाचे दगडही पुन्हा दिमाखात उभे राहणार आहेत. सात बेटांच्या मुंबई शहरातील अंतर मोजण्यासाठी १८१७ ते १८३७ या काळात मैलाचे दगड बसविण्यात आले होते. फोर्ट येथील सेंट थॉमस कॅथेड्रल ते दादर, सायन या दरम्यान १५ ठिकाणी मैलाचे दगड होते. यापैकी शोध लागलेल्या ११ दगडांचे संवर्धन करून त्यांना मूळ स्थानी पुन्हा बसविण्यात येणार आहे, तर काळाच्या ओघात झीज झालेल्या चार दगडांची प्रतिकृती तयार करण्यात येणारआहे.पालिकेच्या पुरातन वास्तू विभागामार्फत हे काम सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी परळ येथील अतिक्रमण जमीनदोस्त करताना मैलाचा दगड सापडला होता. त्या मैलाच्या दगडाची पुनर्स्थापना स्थानिक विभाग कार्यालयाने केली होती. मात्र, त्यानंतर हा प्रकल्प काही कारणांमुळे लांबणीवर पडला. यावेळी संपूर्ण १५ मैलांचा दगड एकसमान मूळ ठिकाणी बसविण्यात येणार असल्याचे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.मैलाचा दगड म्हणजे काय...दोनशे वर्षांपूर्वी एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करताना किती अंतर पार केले, याची नोंद ठेवण्यासाठी मैलाचे दगड बसविण्यात आले होते. १८१७ ते १८३७ काळात सध्याचे फोर्ट येथील सेंट थॉमस कॅथेड्रल हे मध्यबिंदू मानून दादर, सायनपर्यंत आठ मैलांचे अंतर मोजणारे दगड बसविण्यात आले. या दगडांवर रोमन भाषेतील आकडे आहेत. पाच फूट उंच असलेले हे मैलाचे दगड घोडागाडीतून ही दिसतील, अशी रचना करण्यात आली होती.अशी होणार मैलाच्या दगडांची पुनर्स्थापना...पदपथ खाली अर्धवट अथवा पूर्णत: गाडले गेलेले, तसेच अतिक्रमणामध्ये लपलेल्या दगडांची जागा खोदणे, तुटलेल्या किंवा चिपडलेल्या भागाची जागा भरणे, दगडाचा पृष्ठभाग विशेष तंत्राने स्वच्छ करून मैलाचा दगड त्याच्या मूळ जागी बसविण्यात येणार आहे. पालिकेच्या पुरातन विभागामार्फत मैलाचे दगड मूळ स्थानी बसविण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

टॅग्स :मुंबई