साक्षीदारांनी घेतली उच्च न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 02:57 AM2019-08-04T02:57:53+5:302019-08-04T02:58:08+5:30
पोलिसांच्या सुटकेला आव्हान देण्याची हवी परवानगी; सोहराबुद्दीन कथित बनावट चकमक
मुंबई : सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमकप्रकरणी डिसेंबरमध्ये सुटका केलेल्या ३८ पोलीस अधिकाऱ्यांच्या सुटकेला आव्हान देण्याची परवानगी मिळावी, यासाठी या केसमधला साक्षीदार महेंद्रसिन्हा जाला याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्याच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे.
गुजरात व राजस्थान पोलिसांच्या सुटकेला सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन व नयाबुद्दीन यांनी आधीच उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जाला याच्या म्हणण्यानुसार तो या प्रकरणात ‘पीडित’ आहे. त्यामुळे त्याला या पोलिसांच्या सुटकेला आव्हान देण्याचा अधिकार
आहे.
‘प्रकरणातील पोलीस चालवत असलेल्या खंडणी रॅकेटमध्ये मी एक पीडित आहे. डिसेंबर २००५ मध्ये गुजरात एटीएसने मला अटक केली. मला नाहक अटक करण्यात आली. सोहराबुद्दीनप्रमाणे माझीही बनावट चकमकीत हत्या करण्यात येईल, असे मला धमकावण्यात आले व मला माझा जीव वाचवायचा असल्यास १५ लाख रुपये दे, असे डी.जी. वंजारा यांनी मला धमकावले,’ असे जाला याने याचिकेत म्हटले आहे.
निर्णय ठेवला राखून
जाला याने विशेष न्यायालयात साक्ष नोंदविली. पण त्याला समन्स बजावले नव्हते. आपली साक्ष नोंदवावी, यासाठी जाला याने सीबीआयला पत्र लिहिले होते. सीबीआयने जालाला सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा अधिकार नाही. कारण तो साक्षीदार आहे, असा आक्षेप घेतला. न्यायालयाने या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.