Join us

साक्षीला स्वतःच्या पायावर उभे करणार, मुंबई महापालिकेने केला निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 7:24 AM

शेजारच्या मुक्या महिलेच्या दोन महिन्यांच्या बाळाला वाचविताना १४ वर्षांच्या साक्षी दाभेकरच्या पायावर घराची अर्धी भिंत कोसळली. या अपघातात तिचा एक पाय निकामी झाला.

मुंबई : शेजारच्या मुक्या महिलेच्या दोन महिन्यांच्या बाळाला वाचविताना १४ वर्षांच्या साक्षी दाभेकरच्या पायावर घराची अर्धी भिंत कोसळली. या अपघातात तिचा एक पाय निकामी झाला. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या बाळाला वाचविणाऱ्या तिला मदतीचा हात म्हणून महापालिकेने सव्वा लाख रुपये सोमवारी दिले. तसेच तिच्यावर मोफत उपचार करून तिला पुन्हा स्वतःच्या पायावर उभा करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे.पोलादपूर तालुक्यातल्या अतिदुर्गम डोंगरात वसलेल्या केवनाळे गावात शेजारच्या मुक्या महिलेच्या बाळाला वाचविताना साक्षीला एक पाय गमवावा लागला. तिच्या या धाडसाचे कौतुक महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात जाऊन केले. नगरसेवक अनिल कोकिळ यांनी २५ हजारांचा धनादेश दिला. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख उपस्थित होते. साक्षीवर केईएम रुग्णालयात मोफत उपचार केले जातील. तसेच प्रारंभी जयपूर फूट व त्यानंतर १२ लाख रुपये खर्च करून सारबो रबर पाय मोफत बसविण्यात येणार आहेत.साक्षीसारख्या हिंमतवान मुलीची आज समाजाला गरज असून ती हिमतीने उभे राहील, असा मला विश्वास आहे. तिला स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. ती पूर्वीसारखीच चालेल, धावेल. साक्षीने माणुसकीचे दर्शन घडविले. गावागावात आजही चांगले संस्कार असल्याचे या घटनेवरून सिद्ध होते.- किशोरी पेडणेकर, (महापौर, मुंबई)

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका