मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात ज्या साक्षीदारांचे जबाब वगळण्यात (मास्क करण्यात) आले आहेत, त्या साक्षीदारांची या आठवड्यात साक्ष नोंदविणार नाही, असे आश्वासन राष्ट्रीय तपास पथकाने(एनआयए) उच्च न्यायालयाला सोमवारी दिले.दोषारोपपत्रात ज्या साक्षीदारांची नावे नमूद करण्यात आली आहेत, त्या साक्षीदारांच्या जबाबांच्या प्रती मिळाव्यात यासाठी, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. इंद्रजीत महंती व न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठापुढे होती. विशेष न्यायालय सध्या सरकारी वकिलांच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवित आहे. काही साक्षीदारांची नावे वगळण्यात आली आहेत तर काहींचे जबाब वगळण्यात आले आहेत. त्यामुळे अशा साक्षीदारांची उलटतपासणी नोंदविणे बचावपक्षासाठी अशक्य आहे, असे पुरोहितचे वकील श्रीकांत शिवडे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर एनआयएचे वकील संदेश पाटील यांनी ज्या साक्षीदारांची साक्ष वगळण्यात आली आहे, त्या साक्षीदारांची नावे २२ जुलै रोजी बचावपक्षाच्या वकिलांना देण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले. तोपर्यंत त्या साक्षीदारांना ट्रायल कोर्टात साक्ष नोंदविण्यासाठी बोलाविणार नाही, असेही पाटील यांनी न्यायालयाला सांगितले.याआधी या प्रकरणाचा तपास दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (एटीएस) केला. त्यांनी काही साक्षीदारांची नावे व त्यांचे जबाब वगळून बचावपक्षाच्या वकिलांना दोषारोपपत्राची प्रत दिली. जबाब वगळण्यासाठी तपास यंत्रणेने न्यायालयाकडून परवानगी घेतली नाही. त्यांनी स्वत:हूनच निर्णय घेतला, असे पुरोहितने याचिकेत म्हटले आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर १०० लोक जखमी झाले.गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात विशेष न्यायालयाने सर्व आरोपींवर यूएपीए अंतर्गत आरोप निश्चित केले. त्यामध्ये भाजपची भोपाळ खासदार प्रज्ञासिंह ठाकूर हिचाही समावेश आहे.
जबाब वगळलेल्या साक्षीदारांच्या साक्षी या आठवड्यात नोंदविणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 5:44 AM