स्मशानभूमीत ‘ती’ एकटी बजावते सेवा; धीराने केली भीतीवर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 04:08 AM2020-08-14T04:08:16+5:302020-08-14T06:55:47+5:30

पाच एकरांतील भीतीदायक जागेतील धाडसी वावर

woman alone work in five acre cemetery without any fear | स्मशानभूमीत ‘ती’ एकटी बजावते सेवा; धीराने केली भीतीवर मात

स्मशानभूमीत ‘ती’ एकटी बजावते सेवा; धीराने केली भीतीवर मात

googlenewsNext

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : मध्यरात्री पूर्वसूचना न देता कोविड रुग्णाचा पहिला मृतदेह स्मशानभूमीत धडकला. मुसळधार पाऊस. संतप्त नातेवाईक. कागदपत्रेही अपूर्ण. मृतदेह दफन करण्यासाठी खणलेला खड्डाही पाण्याने भरलेला. रात्रीच्या अंधारात कोणी हंबरडा फोडतोय, तर कोणी वाद घालतोय. काही क्षणांसाठी तीही डगमगली. मात्र भीतीला दूर सारून तिने परिस्थिती हाताळली. दफनविधी पार पाडला.

तिने ५० हून अधिक कोरोनाबाधित मृतदेहांच्या मृत्यू नोंदणीसह कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून अंत्यविधी पार पाडले आहेत. वंदना सुनील अवसरमल असे त्यांचे नाव आहे. पाच एकरातील मुलुंडच्या टाटा स्मशानभूमीत त्या सेवा बजावतात.

वंदना या दिवा येथे पती आणि दोन मुलांसह राहतात. पती वकील आहेत. मुलगा सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि मुलगी बीएचएमएस करत आहे. १९९४ पासून अनुकंपा तत्त्वावर त्या पालिकेत रुजू झाल्या. १९९८ पासून आरोग्य मदतनीस म्हणून काम करू लागल्या. सुरुवातीला काम, जबाबदारीमुळे त्यांनी शिक्षणाकडे पाठ फिरली होती. मात्र मुलांच्या शिक्षणानंतर त्यांनी जिद्दीने अभ्यास करून दहावी नापासचा शिक्का पुसला. पुढे पदवीधर झाल्या. पुढे पालिकेच्या संयुक्त स्मशानभूमीत त्यांची मृत्यू नोंदणी कारकून म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २२ ऑगस्टला येथील सेवेला दोन वर्षे पूर्ण होतील.

हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन बांधवांसाठी मुलुंड पूर्वेकडील ही एकमेव स्मशानभूमी आहे. वंदना सांगतात, येथे नोकरीच्या पहिल्याच दिवशी काळजात धस्स झाले. लोकवस्तीपासून दीड किलोमीटर आत असलेली ही स्मशानभूमी. आसपास सर्वच जंगल. त्यात भुंकणाºया श्वानांची भर. रात्रीच्या काळोखात स्वत:ला धीर देत मी निघाले. भुताप्रेतांपेक्षा जिवंत माणसांची भीती जास्त वाटली. हळूहळू भीती कशी व कुठे गायब झाली कळलेच नाही. सध्या भुंकणारे श्वानही मित्र झाले.

माझ्यासाठी कर्तव्य सर्वश्रेष्ठ
वंदना यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना कोणी पाहिला? कधी तरी प्रत्येकाला जायचे आहे. कोरोना हा भीतीने जास्त पसरतो. मी कोरोनाला डोक्यापर्यंत पोहोचू दिले नाही. सध्या कर्तव्यापलीकडे काही नाही. यात वरिष्ठांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि कुटुंबाकडून मिळणारे प्रोत्साहन मला माझे काम करण्यास बळ देते.
- वंदना सुनील अवसरमल, मृत्यू नोंदणी कारकून, मुलुंड पूर्व स्मशानभूमी

कोरोना काळात सलग ४८ तास करतात काम
कोरोना महामारीचा मुंबईत शिरकाव झाल्याच्या सुरुवातीच्या काळात स्टेशनपासून पायीच त्या स्मशानभूमीत येत असत. दिवस-रात्रीच्या दोन्ही शिफ्ट करण्यात त्यांनी कधी महिला म्हणून कारणे दिली नाहीत. कोरोनाच्या काळात ४८ तास सेवा आणि ४८ तास आराम असे कामाचे स्वरूप आहे. त्यामुळे दोन दिवस स्मशानभूमीच्या आवारात असलेल्या कार्यालयातच जेवण आणि राहणे असते. सोबतीला एक कर्मचारी आणि तीन श्वान आहेत. त्यातही रात्री, अपरात्री एखादा कोरोना रुग्णाचा मृतदेह आल्यास त्या नेहमीच कर्मचाºयाच्या पाठीशी उभ्या असतात.

मृतदेहाच्या नोंदणी प्रक्रियेसह कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर मृतदेहाला अग्नी देईपर्यंत त्या स्वत: हजर असतात. एक महिला स्मशानभूमीत काम करते हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. मुलुंड पश्चिमेकडील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी बंद पडल्याने तेथील स्मशानभूमीचा भारही येथील स्मशानभूमीवर आला. अनेकदा एकाच वेळी १० मृतदेह आल्याचेही प्रसंग घडले. मात्र त्यांनी ती परिस्थितीही न घाबरता हाताळली.

वरिष्ठ अधिकाºयांचे सहकार्य, त्यात येथील सहकाºयांच्या सोबतीमुळे स्मशानभूमी जणू दूसरे घर बनल्याचे वंदना सुनील अवसरमल यांनी सांगितले. त्यांच्यातील जिद्द, धाडस इतरांसाठी आदर्श, प्रेरणादायी ठरत आहे.

Web Title: woman alone work in five acre cemetery without any fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.