मुंबई: शेजाऱ्यांच्या टोमण्यांना कंटाळून अंधेरीत एका महिलेनं तिच्या मुलासह आत्महत्या केली आहे. चांदिवलीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. ४४ वर्षांच्या रेश्मा तेंत्रिल यांनी त्यांचा ७ वर्षांचा मुलगा गरुणसोबत इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारली. त्यात दोघांचा दुर्देवी अंत झाला. रेश्मा हा माजी पत्रकार होत्या. महिन्याभरापूर्वीच त्यांच्या पतीचं कोरोनामुळे निधन झालं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा यांनी शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात रेश्मा यांनी शेजारी अयूब खान आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे. अयूब आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य मला मानसित्र द्यायचे, असं रेश्मा यांनी पत्रात लिहिलं आहे. यानंतर पोलिसांनी अयूब यांना अटक केली.५० वर्षांचे डॉक्टर वडील मुलाच्या शिक्षिकेसोबत गुपचूप करत होते लग्न; लेकानं उचललं टोकाचं पाऊल
रेश्मा यांचा मुलाच्या खेळण्याबद्दल शेजाऱ्यांना आक्षेप होता. त्यामुळे ते कायम भांडण करायचे. याबद्दल रेश्मा यांनी ३० मे रोजी फेसबुकवर एक पोस्टदेखील लिहिली होती. रेश्मा यांनी सोमवारी आत्महत्या केली. मात्र त्यांच्यासह मुलाच्या पार्थिवावर अद्याप अंत्यसंस्कार झालेले नाहीत. रेश्मा यांच्या कुटुंबातील एकही सदस्य मुंबईत नाही. त्यांचा भाऊ अमेरिकेत असतो. तो आल्यावर रेश्मा आणि त्यांच्या मुलावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
रेश्मा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राच्या आधारे पोलिसांनी अयूबविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अयूब यांनी आधी रेश्मा यांच्या मुलाची सोसायटीकडे तक्रार केली होती. आपल्या कुटुंबातील सदस्याला गंभीर आजार आहे. रेश्मा यांचा मुलगा आरडाओरड करत असल्यानं त्यांना झोप येत नाही, अशी तक्रार अयूब यांनी नोंदवली होती, अशी माहिती झोनचे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी दिली.