मुंबईत पोलीस कुटुंबाच्या अत्याचाराला कंटाळून व्यावसायिक महिलेने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 06:28 AM2017-11-25T06:28:35+5:302017-11-25T09:36:31+5:30

मुंबई : पोलीस कुटुंबीयांकडून होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून, व्यावसायिक महिलेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मुलुंडमध्ये घडली.

The woman committed suicide due to police family's torture | मुंबईत पोलीस कुटुंबाच्या अत्याचाराला कंटाळून व्यावसायिक महिलेने केली आत्महत्या

मुंबईत पोलीस कुटुंबाच्या अत्याचाराला कंटाळून व्यावसायिक महिलेने केली आत्महत्या

Next

मुंबई : पोलीस कुटुंबीयांकडून होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून, व्यावसायिक महिलेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मुलुंडमध्ये घडली. रिया पालांडे (४६) असे मृत महिलेचे नाव आहे. बेडरूमच्या भिंतीवर ‘मी भारती चौधरीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करते आहे. तिला शिक्षा झाली पाहिजे,’ असे लिहून तिने स्वत:चे आयुष्य संपविले आहे, तसेच त्यांच्या दुकानातून दोन पानी सुसाइड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणी मरोळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दामोदर चौधरी, पत्नी भारती चौधरी आणि मुलगी मिलाक्षीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मुलुंड पूर्वेकडील समर्थ विलामध्ये रिया पालांडे या मुलगा आणि मुलीसोबत राहात होत्या. त्यांचे मुलुंड पश्चिमेकडील परिसरात किराणा दुकान आहे. त्या दिवसभर दुकानात असायच्या. दुपारी ३ ते ५ या वेळेत त्या आरामासाठी घरी जात असत. मात्र, गुरुवारी दुपारी त्या १२ वाजताच तब्येत बरी नसल्याचे सांगून घरी गेल्या. घरात मोलकरणीला बेडरूममध्ये आराम करते, असे सांगून त्यांनी आतून दरवाजा बंद केला.
दरम्यान, आई घरी पोहोचली की नाही, हे विचारण्यासाठी मुलाने फोन केला, परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने मित्र दीपक नायरला घरी पाठविले. तेव्हा त्यालाही मोलकरणीने रिया या आराम करत असल्याचे सांगितले. त्याने दरवाजा ठोठावला, परंतु आतून काहीच प्रतिसाद न आल्याने, अखेर त्याने दरवाजा तोडला. तेव्हा रिया या सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
मृतदेहाशेजारी असलेल्या भिंतीवर त्यांनी, ‘मी भारती चौधरीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करते आहे. तिला शिक्षा झाली पाहिजे. दुकानातल्या डायरीत तिच्या वसुलीबाबत होत असलेल्या त्रासाची माहिती लिहिली आहे,’ असे लिहून त्याच्याखाली स्वाक्षरी केली आहे.
घटनास्थळी दाखल झालेल्या नवघर पोलिसांनी त्यांना तातडीने सावरकर रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी भिंतीवरील मजकूर, तसेच दुकानातील त्यांच्या दैनंदिन हिशोबाची डायरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यामध्ये दोन पानी सुसाइड नोट आहे. यामध्ये भारती चौधरी, पती दामोदर चौधरी आणि मुलगी मीनाक्षी यांनी वसुलीसाठी तगादा लावला होता. यालाच कंटाळून आत्महत्या करत असल्याचे या डायरीत नमूद करण्यात आले आहे.
याच नोटच्या आधारे पोलिसांनी तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधव मोरे यांनी दिली.
>काय आहे प्रकरण?
चौधरी यांनी केलेल्या तक्रार अर्जावरून फ्लॅट विकत घेण्यासाठी चौधरी यांनी रिया पालांडे यांना ३० लाख रुपये दिल्याचे सांगितले, तर पालांडे यांनी पैसेच घेतले नसल्याचा दावा केला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली.
...तर त्या वाचल्या असत्या
रिया पालांडे यांनी सहा महिन्यांपूर्वी मुलुंड पोलीस ठाण्यात चार ते पाच तक्रारी केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या तणावात होत्या. तक्रारींची दखल वेळीच घेतली असती, तर हे प्रकरण निकाली निघाले असते, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या प्रकरणी भांडुप एसीपी शशांक सांडभोर यांच्याकडून चौकशी सुरू होती. याबाबतचा चौकशी अहवाल त्यांनी पुढे पाठविला आहे. मात्र, त्यामध्ये काय माहिती पाठविण्यात आली, याबाबत गुप्तता पाळण्यात आली.
भारती चौधरी कोण?
मुलुंड पोलीस ठाण्याच्या इमारतीत चौधरी कुटुंबीय राहतात. चौधरी ही राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस आहे, तसेच काही संघटना, महिला मंडळाच्याही त्या सदस्या आहेत. त्यांचे पती दामोदर चौधरी एलए -४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Web Title: The woman committed suicide due to police family's torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.