महिला हवालदाराला करायचाय लिंगबदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 05:35 AM2017-11-24T05:35:10+5:302017-11-24T05:35:20+5:30
मुंबई : लिंगबदलासाठी एक महिन्याची सुटी मिळावी, तसेच त्यानंतर महिला कोट्यातून मिळालेली नोकरी नियमित करावी, यासाठी बीडची महिला पोलीस हवालदार ललिता साळवे हिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई : लिंगबदलासाठी एक महिन्याची सुटी मिळावी, तसेच त्यानंतर महिला कोट्यातून मिळालेली नोकरी नियमित करावी, यासाठी बीडची महिला पोलीस हवालदार ललिता साळवे हिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
ललिता साळवीने (२८) लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेसाठी एक महिन्याची सुट्टी मागितली होती. मात्र, बीड पोलीस अधिक्षकांनी सुट्टी देण्यास नकार दिला. तसेच तिला ही शस्त्रक्रिया करता येणार नाही, असेही स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे साळवेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली.
>अॅड़ नकवी यांनी ही याचिका मुख्य न्या़ मंजुळा चेल्लूर यांच्या खंडपीठासमोर सादर केली़ योग्य खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले़
>पोलीस महासंचालक व बीड पोलीस अधिक्षकांना सुटी मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच महिला म्हणून मिळालेली नोकरी पुरुष झाल्यानंतरही कायम ठेवावी, अशी विनंती ललिता साळवी हिने याचिकेत केली आहे.
ललिता ही २००९ मध्ये हवालदार म्हणून पोलीस दलात भरती झाली. सुट्टी मिळवण्याचा अर्ज मंजूर होण्यापूर्वीच तिने नोटाराईज करून नाव ललिता ऐवजी ललित साळवे लावण्यास सुरुवात केली आहे.
>म्हणून लिंग बदलाचा निर्णय
ललिताची २३ जूनला जे़जे़ रूग्णालयामध्ये शारिरीक चाचणीसाठी भरती झाली़ वैद्यकीय चाचणीत तिच्यामध्ये वाय या पुरूषी गुणसूत्रांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले़ तिने मानोसपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करून घेतले़ तिला जेंडर डायसोफोरिया असल्याचे स्पष्ट झाले़ त्यामुळे लिंग बदलाचा निर्णय घेतला़
>मूलभूत अधिकारांचे उल्लंघन
तिने शस्त्रक्रियेसाठी एक महिन्याची सुट्टी मिळावी, यासाठी वरिष्ठांकडे अर्ज केला़ गेल्याच आठवड्यात तिचा अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे बीडच्या पोलिसांनी तिला सांगितले़ मात्र वरिष्ठांचा हा निर्णय याचिकाकर्तीच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला़