क्रेन अंगावर पडून महिलेचा मृत्यू, अंधेरी हायवेजवळील दुर्घटना, रिक्षांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 02:52 AM2020-11-01T02:52:18+5:302020-11-01T02:52:40+5:30
Woman dies after falling on crane : मेट्रोच्या कामासाठी वापरली जाणारी क्रेन शनिवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास जोगेश्वरीवरून वांद्रेच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्गावर निघाली होती.
मुंबई : बसस्टॉपवर उभ्या असलेल्या महिलेच्या अंगावर मेट्रोच्या कामासाठी निघालेली क्रेन कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे अंधेरीच्या गुंदवली परिसरात घडली. या दुर्घटनेत दाेघे जखमी झाले असून, तीन रिक्षांचेही नुकसान झाले. या प्रकरणी क्रेनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक चौकशी सुरू आहे.
मेट्रोच्या कामासाठी वापरली जाणारी क्रेन शनिवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास जोगेश्वरीवरून वांद्रेच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्गावर निघाली होती. दरम्यान, चालकाचा क्रेनवरील ताबा सुटल्याने क्रेन खाली कोसळून तिचे दोन तुकडे झाले. यातीलच एक तुकडा गुंदवली बसस्टॉपजवळ उभ्या असलेल्या एका महिलेच्या अंगावर पडल्याने त्याखाली चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. या महिलेचे नाव एफ. पटेल असे हाेते.
या दुर्घटनेत अन्य दोघे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर तीन रिक्षांचेही नुकसान झाले. या दुर्घटनेनंतर क्रेनचालक घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्यावर पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शाेध सुरू आहे.
चाैकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी प्रकल्प संचालक पी. आर. के. मूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचा अहवाल येत्या दोन दिवसांत प्राप्त होणे अपेक्षित आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली.