IndiGo Airlines Emergency Landing: मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात एका ८९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यानंतर विमानाचे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. रात्री दहाच्या सुमारास वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे विमानाचे छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमान सुखरूप उतरताच तिथल्या वैद्यकीय पथकाने तातडीने महिलेची तपासणी केली. मात्र वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. या सगळ्या प्रकारामुळे विमानातील प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती.
सुशीला देवी असे या महिला प्रवाशाचे नाव असून त्या वाराणसी येथील रहिवासी होत्या. डॉक्टरांच्या पथकाने तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच सुशीला देवी यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी स्वतः क्रूकडे मदत मागितली होती, त्यानंतर तातडीने पावले उचलण्यात आली. मात्र त्याचा मृ्त्यू झाला अशी माहिती विमानात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिली.
परिस्थितीचे गांभीर्य पाहून वैमानिकाने तातडीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाशी संपर्क साधून इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. विमानतळ प्रशासनाने त्वरित प्रतिसाद दिला आणि वैद्यकीय पथकाला सूचना दिली. त्यानंतर विमानाला उतरण्यास परवानगी दिली. विमान सुरक्षितपणे उतरताच वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
या घटनेनंतर विमानतळावर काही काळ गोंधळाचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, लवकरच परिस्थिती पूर्वपदावर आली. त्यानंतर एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून विमान वाराणसीकडे रवाना झाले. तर सुशीला देवी यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
दरम्यान, गेल्या महिन्यात पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. विमानाचे लखनऊमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. प्राध्यापक सतीश चंद्र बर्मन असे या प्रवाशाचे नाव असून ते आसाममधील नलबारी येथील रहिवासी होते. ते बरेच दिवस आजारी होते. ते पत्नी कांचन आणि चुलत भाऊ केशव कुमार यांच्यासोबत प्रवास करत होते.
आणखी एका घटनेत २१ मार्च रोजी एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. लखनऊ विमानतळावर विमानात बसलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीने आधी पाणी प्यायले आणि नंतर सीटवर बसून अचानक बेशुद्ध पडला. विमान उतरल्यानंतर सर्व प्रवासी खाली उतरले, पण तो तसाच बसून राहिला. यानंतर फ्लाइट क्रू मेंबर्सनी तात्काळ वैद्यकीय पथकाला बोलावले, मात्र तोपर्यंत प्रवाशाचा मृत्यू झाला होता.