Join us

नालासोपाऱ्यात विजेच्या झटक्याने महिलेचा जागीच मृत्यू; कुटुंबीयांचा महावितरण व मनपावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 1:14 PM

या प्रकरणी गुरुवारी उशिरा नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

- मंगेश कराळे

नालासोपारा : अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहायला घराबाहेर गेलेल्या एका महिलेचा विजेच्या झटक्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. नालासोपाऱ्याच्या नाळा गावातील देवीच्या वाडी समोर गायवाडी येथे राहणाऱ्या जयंती देवराव म्हात्रे (७४) या वयोवृद्ध महिला गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घरासमोरून जात असलेली गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी घराजवळी गेट जवळ गेली होती. यावेळी तेथील महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील पथदिव्याचा शॉक सर्किट झाल्याने वीजप्रवाह विद्युत वाहक सर्व्हिसवायरसोबत असलेल्या तारेतून प्रवाहित होऊन जयंती म्हात्रे यांना जोरदार विजेचा झटका बसला होता. त्यानंतर त्यांना त्यांची मुले दिलीप व  वंदेश यांनी कुटुंबातील इतर लोकांच्या मदतीने समेळपाडा येथील पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी गुरुवारी उशिरा नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

जयंती म्हात्रे यांच्या राहत्या घराशेजारी तसेच देवीची वाडी परीसरात असलेल्या महावितरण कंपनीच्या खांबावरील पथदिवे बंद असल्याबाबत शेजारी राहणाऱ्या जयेश चौधरी या ग्रामस्थानी महावितरण कंपनीकडे तक्रार केली होती. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी खांबावरील पथदिवे यांची देखभाल व दुरुस्ती ही मनपा दिवाबत्ती विभागाच्या ठेकेदार सांभाळत असल्याचे सांगत हात वर केले होते. २५ सप्टेंबरला जयेश चौधरी यांनी मनपाच्या दिवाबत्ती देखभाल विभागाचे ठेकेदार संतोष तांडेल यांच्याकडे रितसर तक्रार करून परिसरातील पथदिवे बंद असून अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाच्या अगोदर ते दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र ठेकेदार संतोष तांडेल यांनीही वेळेत पथदिव्याची दुरुस्ती केली नसल्यामुळे शॉक सर्किट होऊन वीजप्रवाह सर्विस वायरच्या सपोर्ट वायरमध्ये प्रभावित झाल्याने हा अपघात झाला. 

विशेष म्हणजे दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी महावितरण कंपनीचे नालासोपारा उपविभागाचे उमराळा शाखेचे सहाय्यक अभियंता भरत दुधावडे यांच्याशी संपर्क साधत दुर्घटनेची माहिती दिली होती. मात्र दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली असतानाही संबंधित सहाय्यक अभियंता यांनी घटनास्थळी जाऊन दुर्घटना का घडली याची पाहणी करणे गरजेचे असताना दिवाबत्ती देखभाल दुरुस्ती विभाग मनपा सांभाळत असल्याचे सांगत कामात कामचुकारपणा केला होता. याबाबत आता महावितरण कंपनीचे संबंधित अधिकारी, कर्मचारी मनपाचे दिवाबत्ती विभागाचा ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

टॅग्स :गुन्हेगारी