विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू, मोटारसायकलची बसला धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 01:43 AM2019-03-06T01:43:02+5:302019-03-06T01:43:07+5:30
मोटारसायकलने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसच्या चाकाखाली जाऊन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी मालाडमधील मार्वे रोडवर घडली.
मुंबई : मोटारसायकलने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसच्या चाकाखाली जाऊन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी मालाडमधील मार्वे रोडवर घडली. महिला पतीसोबत मोटारसायकलवरून जात असताना हा अपघात घडला.
ममता निषाद परब असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. मढच्या बोटकर गल्लीमध्ये ती पतीसोबत राहत होती. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ती मार्वे रोडवरून पतीसह मोटारसायकलवर निघाली होती. त्याच दिशेने एक भरधाव मोटारसायकल आली आणि परब दाम्पत्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामुळे निषाद परब यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दोघेही रस्त्यावर कोसळले. नेमकी त्याचवेळी रूट क्रमांक २७२ ही बस त्या मार्गावरून येत होती.
अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे गोंधळलेल्या बसचालकालाही गाडी नियंत्रित न करता आल्याने ममता या थेट गाडीच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी परब यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पतीवर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर मार्वे रोड परिसरातील वाहतूक बराच काळ खोळंबली होती. मालवणी पोलिसांनी या प्रकरणी निषाद परब यांचा जबाब नोंदविला असून अनोळखी मोटारसायकल चालकाचा शोध सुरू आहे.