Join us

महिला, दिव्यांग डब्यात घुसखोरी

By admin | Published: April 15, 2017 2:36 AM

लोकलच्या आरक्षित महिला डब्यात पुरुषांची आणि दिव्यांग डब्यात सर्वसामान्य प्रवाशांची घुसखोरी अद्यापही थांबत नसून त्याचा मनस्ताप महिला तसेच दिव्यांग प्रवाशांना

मुंबई : लोकलच्या आरक्षित महिला डब्यात पुरुषांची आणि दिव्यांग डब्यात सर्वसामान्य प्रवाशांची घुसखोरी अद्यापही थांबत नसून त्याचा मनस्ताप महिला तसेच दिव्यांग प्रवाशांना सहन करावा लागत आहे. २0१६-१७मध्ये पश्चिम रेल्वेने महिला आणि दिव्यांग डब्यात घुसखोरी करणाऱ्या ६0 हजार ३४९ जणांवर कारवाई केल्याचे समोर आले आहे. यातील ५५ जणांना जेलची हवा खावी लागली. लोकलच्या आरक्षित महिला डब्यात पुरुषांना आणि दिव्यांग डब्यात सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास बंदी आहे. तरीही, प्रवाशांकडून या नियमाला तिलांजली दिली जाते. त्यामुळे बऱ्याचदा प्रवाशांमध्ये खटके उडतात. दिव्यांग डब्यात घुसखोरी करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिव्यांग प्रवाशांकडून जोरदार विरोधही केला जातो. प्रसंगी त्याचे हाणामारीत रूपांतर होते. ही घुसखोरी रोखण्यासाठी रेल्वे पोलीस आणि टीसींकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. पश्चिम रेल्वेमार्गावर २0१६-१७मध्ये दिव्यांग डब्यात घुसखोरीची ४४ हजार ३३७ प्रकरणे दाखल झालेली आहेत. यातील ४१ जणांना जेलमध्ये जावे लागले असून, उर्वरित प्रवाशांकडून एकूण १ कोटी १0 लाख ३८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. महिला डब्यातही पुरुषांची घुसखोरी मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. महिलांच्या आरक्षित डब्यात पुरुष प्रवाशांनी घुसखोरी केल्याच्या १६ हजार १२ केसेस दाखल झाल्या असून, यातील १४ जणांना जेल झाली. तर, उर्वरित प्रवाशांकडून ३ लाख ३0 हजार ६00 रुपये दंड वसुली करण्यात आली. (प्रतिनिधी)सव्वा कोटीचे सामान केले परत- १८२ हेल्पलाइनवरील सामान आणि माल हरवल्याच्या तक्रारींची दखल घेत तपासाअंती १ कोटी २३ लाख ८३ हजार ७२६ रुपये किमतीचा माल व सामान प्रवाशांना परत करण्यात आले.