कबूतर घरात येऊ नये म्हणून उपाय करायला गेलेल्या महिलेचा खिडकीच्या ग्रिलमधून पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 03:51 PM2017-12-02T15:51:11+5:302017-12-02T18:18:28+5:30
कबूतर घरात येऊ नये म्हणून उपाय करायला खिडकीच्या ग्रिलमध्ये गेलेल्या एका गृहिणीचा इमारतीचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.
मुंबई- कबूतर घरात येऊ नये म्हणून उपाय करायला खिडकीच्या ग्रिलमध्ये गेलेल्या एका गृहिणीचा इमारतीचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. कबूतर घरात येऊ नये यासाठी उपाय करायला बेडरूमच्या खिडकीवरील ग्रिलमध्ये ही महिला उतरली होती. करूणा मोदी असं या महिलेचं नाव असून कुर्ल्यातील नेहरू नगरच्या शिवसृष्टी सोसायटीमधील रामकृपा इमारतीत ही घटना घडली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने महिलेच्या कवटीला जबर मार लागला, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.
करूणा (वय 57) या त्यांचा पती विजय व मुलगी वैष्णवी यांच्यासह राहत होत्या. करूणा यांच्या पतीची एक खासगी कंपनी असून मुलगी एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. रामकृपा इमारतीत टू बीएचके फ्लॅटमध्ये हे कुटुंब राहतं. या घरातील बेडरूमच्या खिडकीला दहा वर्षांपूर्वी 33 मिमीची ग्रिल बसवली होती. घटनेनंतर ही ग्रिल एका बाजूला झुकली. दहा वर्षापूर्वीची ही ग्रिल पूर्णपणे निकामी झाली असल्याचं यावरून समजतं आहे.
बऱ्याचदा आई-वडील त्यांच्या मुलांना गॅलेरीमध्ये खेळायला पाठवतात. ग्रिल भक्कम आहे या विचाराने मुलांना तेथे खेळण्याचा सल्ला देतात. पण ही घटना आमच्या सगळ्यांसाठी डोळे उघडणारी असल्याचं, तेथिल एका स्थानिक व्यक्तीने म्हंटलं आहे. ज्या ग्रिलमध्ये आपण जड वस्तू, सायकली, झाडं आणि उपयोगात नसलेलं सामान ठेवतो. ती ग्रील अशी कोसळेल, असं कधीही वाटलं नव्हतं, असंही ते म्हणाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास वैष्णवी घरातील एका बेडरूममध्ये होती. तर तिची आई दुसऱ्या बेडरूममध्ये होती. करूणा या त्यावेळी कबुतर घरात येऊ नये यासाठी ग्रिलला स्ट्रिंग बांधण्याच्या प्रयत्नात होत्या. 'अचानक मला जोरात ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी दुसऱ्या बेडरूममध्ये धाव घेतली. त्यावेळी खिडकीची ग्रिल बॉक्स आईसह पडताना दिसला. मी लगचे खाली धाव घेतली पण तोपर्यंत खूप उशिर झाला होता, असं वैष्णवीने सांगितलं. दरम्यान, नेहरू नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.