मुंबई : शिवाजीनगर, राहटणी, पिंपरी येथील एका शिक्षिकेचा फसवणुकीने झालेला अवैध विवाह रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने अखेर नऊ वर्षांनी तिची या नकोशा लग्नगाठीतून सुटका केली आहे.स्वप्नांजली (पूर्वाश्रमीच्या सुनंदा अजित दळवी) यांचा देहूरोड येथील एक वाहनचालक संदीप आनंदा पाटील यांच्याशी एप्रिल २०१० मध्ये पुण्याच्या विवाह नोंदणी निबंधकांपुढे नोंदणी पद्धतीने झालेला आंतरजातीय विवाह ‘स्पेशल मॅरेज अॅक्ट’नुसार मुळातच अवैध असल्याचे घोषित करून न्या. एन. नागेश्वर राव व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने तो विवाह रद्दबातल केला. स्वप्नांजली यांनी केलेल्या अपिलावर हा निकाल देण्यात आला. या कायद्याच्या कलम ४(ए) अन्वये आधीच्या लग्नाची पत्नी किंवा पती हयात असताना केलेला दुसरा विवाह मुळातच अवैध ठरतो. आधीच्या पत्नी सविता पाटील हयात असताना व त्यांच्याशी काडीमोड न घेताच संदीप यांनी आपण अविवाहित असल्याचे भासवून आपल्याशी विवाह केल्याने तो रद्द करावा, असा दावा स्वप्नांजली यांनी पुणे जिल्हा न्यायालयात केला होता. परंतु ‘स्पेशल मॅरेज अॅक्ट’मध्ये झालेला विवाह अशा कारणावरून रद्द करण्याची तरतूद नाही; शिवाय दावा विलंबाने करण्यात आला आहे, असे म्हणून जिल्हा न्यायाधीशांनी तो फेटाळला. त्याविरुद्ध केलेले प्रथम अपीलही उच्च न्यायालयाने फेटाळले म्हणून स्वप्नांजली सर्वोच्च न्यायालयात आल्या होत्या. संदीप यांचा बचाव असा होता की, आपण मार्च २००७ मध्ये भुसावळ येथे सविता या आपल्या मामेबहिणीशी विवाह केला. याची सुनंदाला (स्वप्नांजली) पूर्ण कल्पना होती. तरीही ती आपल्या एवढी एकतर्फी प्रेमात पडली की लग्न न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे नाइलाजाने आपल्याला तिच्याशी विवाह करावा लागला. परंतु तो करण्यापूर्वी आपण आधीची पत्नी सविता हिच्याशी पारंपरिक पद्धतीने काडीमोड घेतला होता. या सुनावणीत स्वप्नांजलीसाठी अॅड. विनय नवरे यांनी तर संदीपसाठी ज्येष्ठ वकील सुशील कुमार जैन यांनी काम पाहिले.>खालची दोन्ही न्यायालये चुकलीया प्रकरणाचा निकाल करताना जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालय या दोन्हींनी चूक केल्याचा ठपका सर्वोच्च न्यायालयाने ठेवला. संदीप यांच्या आधीच्या विवाहाची स्वप्नांजली यांना कल्पना असणे व त्यांच्याशी विवाह करण्यापूर्वी संदीपने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेणे हे दोन्ही वादमुद्दे रीतसर साक्षीपुराव्यांशी सिद्ध न होताच मान्य केले. शिवाय ‘स्पेशल मॅरेज अॅक्ट’चे लागू होणारे कलम दुर्लक्षित करून भलत्याच कलमाच्या आधारे निकाल दिले गेले.
फसवणुकीच्या लग्नगाठीतून अखेर महिलेची झाली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 5:27 AM