Join us

रिवॉर्ड पॉइंटच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 5:39 AM

रिवॉर्ड पॉइंट्च्या नावाखाली ७२ वर्षीय वृद्धाची फसवणूक केल्याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : रिवॉर्ड पॉइंट्च्या नावाखाली ७२ वर्षीय वृद्धाची फसवणूक केल्याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची सव्वा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. माटुंगा पूर्वेकडील परिसरात तक्रारदार विश्वनाथन रंगनाथन कृष्णाअय्यर विश्वनाथन (७२) राहण्यास आहेत. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास अनोळखी नंबरवरून कॉलधारकाने, बँकेच्या कॉल सेंटरमधून बोलत असल्याचे त्यांना सांगितले. क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळाल्याचे सांगत हे रिवॉर्ड पॉइंट्स पैशांमध्ये रूपांतरित करण्याच्या बहाण्याने त्याने विश्वनाथन यांच्याकडून मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक मागितला. त्यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवत ओटीपी क्रमांक सांगितला.त्याच दरम्यान त्यांच्या खात्यातून १ हजार ४२२.१० युरो म्हणजेच भारतीय चलनानुसार १ लाख १५ हजार ७८७ रुपये काढून घेतले. थोड्याच वेळात खात्यातून पैसे गेल्याचा संदेश विश्वनाथन यांच्या मोबाइलवर आला. हा संदेश पाहताच त्यांना धक्का बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी रविवारी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांनी दिली.