Join us

महिलेनं फुटपाथवरच बाळाला जन्म दिला अन् PSI प्रिया मॅडमने बजावली 'नाईट ड्युटी'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 2:44 PM

पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड या 4 जुलै रोजी नाईड ड्युटीवर कार्यरत होत्या, त्यावेळी त्यांना त्यांच्या सहकारी पोलिसांचा फोन आला

ठळक मुद्दे पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड या 4 जुलै रोजी नाईड ड्युटीवर कार्यरत होत्या, त्यावेळी त्यांना त्यांच्या सहकारी पोलिसांचा फोन आलापोलिसांच्या विनंतीवरुनही रुग्णालयाने मदतीस नकार दिल्यानंतर ते पोलीस घटनास्थळी दाखल झाले

मुंबई - कोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयांत रुग्णांची मोठी गर्दी झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांनाही रुग्णालयात बेड मिळेना झाले आहेत. त्यामुळे, इतर रुग्णांनाही रुग्णालयात दाखल करुन घेण्यात येत नाही. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात गरीब महिलेला दाखल करुन घेण्यास रुग्णालयाने नकार दिला. त्यानंतर, संबंधित महिलेने फुटपाथवरच बाळाला जन्म दिला. यासंदर्भात माहिती मिळताच, महिला पोलीस अधिकारी प्रिया गरुड यांनी घटनास्थळी धाव घेत मातेसह बाळाला रुग्णालयात दाखल केले. आपली नाईट ड्युटी बजावताना या मातेच्या आणि बाळाच्या सुरक्षेसाठी प्रिया गरुड यांनी अनोतात प्रयत्न केला, अधिकार असतानाही त्यांना रुग्णालयाशी संघर्ष करावा लागला. 

पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड या 4 जुलै रोजी नाईड ड्युटीवर कार्यरत होत्या, त्यावेळी त्यांना त्यांच्या सहकारी पोलिसांचा फोन आला. एक गरोदर महिला मेट्रो सिनेमाजवळील एका फुटपाथवर मोठ्याने ओरडत असून तिला प्रसुतीच्या कळा येत आहेत, अशी माहिती गरुड मॅडमला देण्यात आली. त्यानंतर, पीएसआय गरुड यांनी पोलिस कंट्रोल रुमला संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर, तात्काळ मेट्रो सिनेमा हॉलजवळ धाव घेतली, तसेच काही पोलिसांना जवळीलच कामा आणि अल्बेस रुग्णालयात मदतीसाठी पाठविण्यात आले. मात्र, रुग्णालयातील आरएमओने मदत करण्यास नकार दिला. परिस्थिती सांगितल्यानंतरही रुग्णालयाने ऐकून घेतले नाही. संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करण्याची सूचना आरएमओने केली. 

पोलिसांच्या विनंतीवरुनही रुग्णालयाने मदतीस नकार दिल्यानंतर ते पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यानच्या काळात महिलेने फुटपाथवरच बाळाला जन्म दिला. मात्र, बाळाला जन्म दिल्यानंतरही नाळ पोटाशीची जुळले हीती. तितक्यात 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली, मात्र या रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर नव्हते. तब्बल तीन तासानंतर पीपीई किट परिधान करुन डॉक्टर आणि त्यांचा एक सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, महिलेची नाळ तोडून आई व बाळाला रुग्णालयात नेण्यात आले. 

दरम्यान, कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, संबंधित महिला ही मानसिकदृष्ट्या अशक्त असून बाळाची प्रकृती उत्तम आहे. ती वेळ अतिशय भयानक होती, मुसळधार पाऊस पडत होता. सुदैवाने आम्ही घटनास्थळावर होतो, अन्यथा आई व बाळासोबत मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती, असेही मदतकर्त्या पीएसआय प्रिया गरुड यांनी सांगितले.

टॅग्स :पोलिसमुंबईहॉस्पिटलकोरोना वायरस बातम्या