मुंबई : एखादी विवाहिता छळ आणि मारहाण यामुळे स्वत:हून सासरच्या घरातून निघून गेली तरी त्याचा अर्थ पतीने तिचा सांभाळ केला नाही असाच होतो व त्यामुळे अशी स्त्री उदरनिर्वाहासाठी पतीकडून पोटगी मिळण्यास पात्र ठरते, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.या निकालामुळे ५२ वर्षांपूर्वी पतीला सोडून माहेरी आलेल्या राजगुरुनगर कुंभारवाडा, ता. खेड. जि. पुणे येथील चंद्रभागा बोºहाडे या महिलेला तिच्या पतीकडून २४ वर्षांच्या थकबाकीसह दरमहा ५०० रुपये पोटगी मिळू शकणार आहे.चंद्रभागा यांचे सन १९६४ मध्ये खेड तालुक्यातील शेतकरी बबनराव रामभाऊ बोºहाडे यांच्याशी लग्न झाले. परंतु छळ व मारहाण यामुळे दोनच वर्षांत चंद्रभागा पतीला सोडून माहेरी निघून आल्या. परंतु वडिलांच्या निधनानंतर म्हणजे पतीला सोडून माहेरी आल्यानंतर २८ वर्षांनी त्यांनी पतीकडून पोटगी मिळावी यासाठी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १२५ अन्वये अर्ज केला. राजगुरुनगर येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी तो फेटाळला. त्याविरुद्ध केलेला फिरविचार अर्ज मंजूर करून पुण्याच्या सत्र न्यायालायने चंद्रभागा यांना जुलै ९४ पासून दरमहा ५०० रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला.याविरुद्ध चंद्रभागाचे पती बबनराव यांनी उच्च न्यायालयात केलेले अपील न्या. मृदुला भाटकर यांनी १७ वर्षांनी फेटाळले व सत्र न्यायालायचा पोटगीचा आदेश कायम केला. दरम्यानच्या काळात बबनराव याने दुसरे लग्नही केले आहे.बबनराव यांच्यासाठी अॅड. सौरभ ओक यांनी. चंद्रभागा यांच्यासाठी अॅड. विलास तपकिर यांनी तर सरकारसाठी अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर ऋतुजा आंबेकर यांनी काम पाहिले.संवेदनशील न्यायाधीश हवेतन्या. भाटकर यांनी निकालपत्रात म्हटले की, ५० वर्षांपूर्वी विवाह झालेल्या ग्रामीण अशिक्षित महिलांच्या प्रकरणांचा विचार करताना न्यायालयांनी संवेदनशील असायला हवे. चंद्रभागाशी आपला विवाहच झाला नव्हता असा मुद्दा बबनरावने मांडला. पण त्याने उभ्या केलेल्या एकाही साक्षीदाराने त्यास दुजोरा दिला नाही. उलट चंद्रभागाच्या सर्व साक्षीदारांनी विवाहास दुजोरा दिला. कलम १२५ अन्वये केलेल्या अर्जात पत्नीने विवाहाचे सबळ पुरावे देण्याची गरजही नसते. मारहाण व छळामुळे पत्नी स्वत: सासर सोडून माहेरी निघून जाते यावरून पतीनेच तिचा नीट सांभाळ केला नाही, हे दिसून येते.
महिलेला ५२ वर्षांनी मिळाली पोटगी!; हायकोर्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 2:18 AM