Join us  

रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला मिळाला मोबाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2017 10:27 PM

ठाणे रेल्वे स्थानक ते गोखले रोड मार्गावरुन जाणा-या डोंंबिवलीतील नम्रता कांमडी या महिलेचा मोबाईल मंगळवारी सकाळी रिक्षातच विसरला होता.

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक ते गोखले रोड मार्गावरुन जाणा-या डोंंबिवलीतील नम्रता कांमडी या महिलेचा मोबाईल मंगळवारी सकाळी रिक्षातच विसरला होता. त्याच रिक्षाचा चालक संदीप भगत यांनी तो नौपाडा पोलिसांकडे दिला. मिळालेला हा मोबाईल नौपाडा पोलिसांच्या मार्फतीने या महिलेला सुपूर्द केल्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता.ठाणे रेल्वे स्थानक ते गोखले रोडवरील बँक आॅफ महाराष्ट्र असा प्रवास करण्यासाठी ही महिला ८ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास संदीप यांच्या रिक्षामध्ये बसली. योगायोगाने तिने रिक्षा चालकाचे नाव, रिक्षा क्रमांक आणि लायसन क्रमांकाच्या पाटीचा फोटो घेतला होता. आपला मोबाईल रिक्षातच राहिल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने नौपाडा पोलिसांकडे याबाबतची तक्रार देतांना रिक्षा चालकाच्या नावासह सर्वच माहिती पोलिसांना दिली. तिच्या आधारे पोलिसांनी संदीपशी त्याच मोबाईलवर संपर्क साधला. ज्याचा मोबाईल असेल, तो आपल्याला नक्कीच संपर्क करेल, यासाठीच त्यांनी तो सुरुच ठेवला होता.आपल्याकडे हा मोबाईल असून तो आपण पोलीस ठाण्यातच देण्यासाठी येत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. ते पोलीस ठाण्यात आल्यानंतर भगत आणि पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या हस्ते नम्रता यांना हा मोबाईल सुपूर्द करण्यात आला. आपला हरवलेला मोबाईल अवघ्या काही तासांमध्येच परत मिळाल्यामुळे पोलिसांची तत्परता आणि भगत यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.