मुंबई : मुलाविरुद्ध केलेली पॉक्सोची तक्रार मागे घेण्यास नकार दिला म्हणून तक्रारदार मुलीच्या आईला भरचौकात मारहाण केल्याची घटना कुर्ला येथे घडली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या वत्सलाताई नाईक नगरामध्ये यामध्ये जखमी झालेली महिला कुटुंबीयांसोबत राहते. मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पीडित महिलेने आरोपीच्या मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मुलाला अटक करण्यात आली.याच रागात आरोपीच्या वडिलांनी भरचौकात मारहाण करत चाकूने वार केल्याची घटना सोमवारी घडली. स्थानिकांच्या मदतीने महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत.तरुणाला रॉडने मारहाणदोघांच्या भांडणात मध्यस्थी केली म्हणून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटनाट्रॉम्बेमध्ये घडली. या प्रकरणी देवनार पोलिसांनी हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.ट्रॉम्बे चित्ता कॅम्प परिसरात २२ वर्षीय वाजिदअली हजरतअली शेख राहतात. आरोपीचे त्यांच्या भावासोबत भांडण झाले. तेव्हा शेखने मध्यस्थी करीत भांडण सोडविले. याचा राग मनात धरून आरोपीने शेख यांच्यावर मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास रॉडने हल्ला केला. यामध्ये शेख गंभीर जखमी झाले आहेत.देवनारमध्ये खंडणीसाठी प्राणघातक हल्लादेवनारमध्ये ५० हजार रुपयांच्या खंडणीसाठी व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना घडली. या प्रकरणी देवनार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.गोवंडीच्या भीमवाडी रोड परिसरात युनुस काले खान (३८) कुटुंबीयांसोबत राहतात. मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास ते कामानिमित्त देवनार पोलीस ठाण्याच्या बीट क्रमांक २च्या समोर उभे होते.त्याचदरम्यान समोरून आलेल्या आरोपीने त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी दिली. त्यांनी नकार देताच आरोपीने त्यांच्यावर चाकूने वार केले. यामध्ये ते जखमी झाले. नागरिक जमताहेत पाहून आरोपीने पळ काढला. खान यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महिलेला भरचौकात मारहाण, तक्रार मागे न घेतल्याने केले कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 1:49 AM