शौचालयात ७ फुटी अजगर पाहून महिलेला आली चक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 02:37 PM2019-04-05T14:37:56+5:302019-04-05T14:41:30+5:30
महापालिकेत काम करणारे विनय यांना दोन मुले असून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला या प्रकाराने धक्का बसला आहे.
मुंबई - भांडूपमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भांडूपच्या महापालिका वसाहतीत राहणारे विनय ढोबळे यांच्या शौचालयात सात फुटी अजगर आढळला. या प्रकारामुळे ढोबळे कुटुंबिय हादरुन गेले आहेत. शौचालयात भलामोठा अजगर पाहून ढोबळे यांच्या पत्नीला तर चक्कर आली. मध्यरात्रीच्या सुमारास विनय यांनी शौचालयाचा दरवाजा उघडला तेव्हा शौचालयाच्या पॉटमध्ये अजगर पाहून त्यांचे धाबे दणाणले. ढोबळे यांनी लगेच दरवाजा बंद करुन बाहेरुन कडी लावली. महापालिका वसाहतीत तळ मजल्यावर राहणाऱ्या विनय ढोबळे हे लगेच पत्नी आणि मुलांना घेऊन घराबाहेर पडले व शेजाऱ्यांना जागे करुन त्यांना या प्रकाराची माहिती दिली. महापालिकेत काम करणारे विनय यांना दोन मुले असून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला या प्रकाराने धक्का बसला आहे.
सुदैवाने त्यावेळी ढोबळे यांचा शेजारी राहणाऱ्या अक्षय पाटकरकडे सर्पांची सुटका करणाऱ्या एका संस्थेचा फोन नंबर होता. रात्री दोनच्या सुमारास विनय ढोबळे यांच्या घराच्या शौचालयाच्या पॉटमधून सर्पमित्रांनी या अजगराची सुटका केली. विनय ढोबळे ज्या ठिकाणी राहतात परिसर संजय गांधी नॅशनल पार्कजवळ आहे. ढोबळे यांच्या घरापासून काही अंतरावर काही तासांनी आणखी एक अजगर सापडला. हा अजगर नागरी वस्तीपर्यंत कसा पोहोचला हे सांगता येणे अवघड आहे. मात्र, भक्ष्याच्या शोधात जलवाहिनीमधून हा अजगर घराच्या शौचालयापर्यंत आला असावा असा अंदाज सर्पमित्राने व्यक्त केला.