मुंबई : केनियातून मुंबईत दाखल झालेल्या आणि युकेची नागरिक असलेल्या एका महिलेला सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. सुमारे ३ किलो ४० ग्रॅम वजनाचे सोने तिने तिच्या अंतर्वस्त्रात लपविल्याचे अधिकाऱ्यांना तिच्या तपासणीत आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत एक कोटी ६३ लाख रुपये इतकी आहे.
उपलब्ध माहितीनुसार, केनियातून मुंबईत दाखल होणाऱ्या एका परदेशी व्यक्तीमार्फत सोन्याची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी विमानतळावर सापळा रचला होता. हे विमान मुंबईत आल्यानंतर त्यातून उतरलेल्या सारा मोहम्मद ओमर या ४० वर्षीय महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे तिला बाजूला घेत अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली. यावेळी महिला अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली असता तिच्या अंतर्वस्त्रामध्ये २२ कॅरेट सोन्याचे १७ बार आढळून आले तर सोन्याची विविध आभूषणे देखील आढळून आली. तिची चौकशी केली असता तिने या तस्करीची कबुली अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.