लोअर परळ येथील उबर कॅबमध्ये महिला पत्रकाराला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 05:25 AM2018-06-26T05:25:49+5:302018-06-26T05:25:52+5:30
उबर कॅबमध्ये सहप्रवासी महिलेसोबत झालेल्या वादातून महिला पत्रकार उष्णोतो पॉल यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची
मुंबई : उबर कॅबमध्ये सहप्रवासी महिलेसोबत झालेल्या वादातून महिला पत्रकार उष्णोतो पॉल यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी लोअर परळ परिसरात घडली. याप्रकरणी पॉल यांनी दिलेल्या तक्रारीवरून एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी सहप्रवासी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पॉल यांनी केलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी ती शेअरिंगद्वारे उबरने प्रवास करत होती. त्याच दरम्यान सहप्रवासी महिलेने जास्त पैसे देऊनही अखेरचा ड्रॉप देत असल्यामुळे चालकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पॉलने मध्यस्थी करत संबंधित महिलेला समजाविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने पॉललाच टोमणे मारण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले.
मात्र उबर लोअर परळच्या उर्मी इस्टेट पोहचताच, प्रवासी महिलेने तिला मारहाण सुरू केली. तिचे केस ओढून दरवाजावर आदळले. तिच्या चेहऱ्यावर नखाने ओरबाडले. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याकडून तिला मारहाण सुरू होती. अखेर उर्मी इस्टेटच्या सुरक्षारक्षकाने मदतीसाठी धाव घेतली. महिला प्रवासी उतरून निघून गेली. तेथील सुरक्षारक्षकानेच पॉलला पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तक्रार दाखल केली.