मुंबई : परळच्या वाडिया रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातून गायब झालेली एक महिन्याची चिमुरडी आग्रीपाडा येथील सातरस्ता परिसरात सापडली. या मुलीला ताब्यात घेऊन आग्रीपाडा पोलिसांनी तिला नायर रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सातरस्ता परिसरातील साने गुरुजी मार्ग येथे मनिष जोरे आणि संपदा जोरे कुटुंबीय राहतात. त्यांची एक महिन्याची चिमुरडी आजारी असल्याने तिला वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाडिया रुग्णालयातील अतिदक्षता विभागात या मुलीवर उपचार सुरू होते. अतिदक्षता विभागात नातेवाइकांना प्रवेश नसल्याने जोरे दाम्पत्य अतिदक्षता विभागाच्या बाहेरील परिसरात बसले होते. बुधवारी सकाळच्या सुमारास त्यांची मुलगी गायब झाल्याचे तेथील कक्षसेवकाच्या लक्षात आले. त्याने तत्काळ वरिष्ठांना याची सूचना दिली. चिमुरडी गायब झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी वाडिया रुग्णालयाने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून अधिक तपास सुरू असताना सातरस्ता परिसरातील एका कचराकुंडीजवळील प्लास्टिक पिशवीवर एक चिमुरडी आढळली. आग्रीपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चिमुरडीला ताब्यात घेतले. तपासामध्ये कचराकुंडीजवळ सापडलेली चिमुरडी वाडिया रुग्णालयातील असल्याचे निष्पन्न झाले. मुलगी सापडल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला बाळाला घेऊन जात असताना दिसत आहे. ती महिला चिमुरडीची आई असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेनेही पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक सरंभळकर यांनी दिली.
वाडिया रुग्णालयातून गायब झालेली चिमुरडी सापडली
By admin | Published: June 03, 2016 2:11 AM