मुंबई- ठाण्याहून सीएसटीला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका महिलेशी अश्लिल वर्तन झाल्याती धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्यादेखत हा संतापजनक प्रकार घडला. काल रात्री 11 च्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपीने महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केला. हा संपूर्ण प्रकार एका अपंग व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केला. आरोपी हा पीडित महिलेचा मित्र असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे. पीडित महिला व आरोपी आधीपासून एकमेकांना ओळखत होते. आधी महिलेने आरोपीला पैशांची मदत केली होती. तेच पैसे महिलेने पुन्हा मागितले. यावरून वाद झाला असून दारू प्यायलेल्या आरोपीने रागात महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केला. रफिक चिनकन अली खान असं आरोपीचं नाव असून तो टॅक्सी ड्रायव्हर आहे.
5 एप्रिल रोजी घडलेली ही घटना आहे. त्यादिवशी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारात पीडित महिला व आरोपी भायखळा स्टेशनवर भेटले होते. महिला तिच्या पतीला भेटायला कल्याणला जात होती. आरोपीने तिला संध्याकाळी ट्रेनमध्ये बसवलं व रात्री साडेदहा वाजता डोंबिवली स्टेशनला भेटण्याचं सांगितलं. ठरल्याप्रमाणे महिला ट्रेनमध्ये बसली. कल्याणहून येताना ती अपंगांच्या डब्यात बसली. आरोपीही त्याच डब्यात बसला. ट्रेनमध्ये बसल्यावर पीडित महिलेने आरोपीकडे पैसे परत मागितले. तसंच त्रास का देतो, अशी विचारणा केली. त्याच वेळी महिलेच्या मोबाइलवर फोन आला. यानंतर आरोपीने महिलेला कोणाचा फोन आला, असं विचारत मारहाण करायला सुरूवात केली, अशी माहिती दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन बोबडे यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर करून दिली आहे.
'काल रात्री 11 च्या सुमारास मी ठाण्याहून सीएसटीला जाणाऱ्या लोकलच्या दिव्यांगांच्या डब्यात चढलो. त्यावेळी एक व्यक्ती एका महिलेला मारहाण करत होता. मी अपंग असल्याने पीडितेच्या मदतीसाठी जाऊ शकलो नाही,' अशी माहिती सहप्रवाशाने दिली. दिव्यांगांच्या डब्याशेजारीच महिलांचा डबा होता. यामध्ये फक्त एक पत्रा होता. महिलांच्या डब्यातील एक पोलीस कर्मचारी हा संपूर्ण धक्कादायक प्रकार पाहत होता. 'डब्यातील साखळी खेचून गाडी थांबवा, अशी विनंती मी त्या पोलिसाला करत होतो. मात्र त्याने साखळी खेचली नाही. त्यामुळे ती व्यक्ती त्या महिलेला मारहाण करतच राहिली,' असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.महिलेला मारहाण करणाऱ्या व्यक्तीला दादरमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले. या धक्कादायक प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासोबतच पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिकादेखील अतिशय संतापजनक आहे. साखळी खेचून गाडी थांबवणे शक्य असताना पोलिसांनी ती तत्परता का दाखवली नाही?, गाडीतील सहप्रवासी तिच्या मदतीसाठी का धावले नाहीत?, हेदेखील प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत.