लोकमत न्यूज नेटवर, मुंबई: दिल्ली नियंत्रण कक्षात आलेल्या एका कॉलमध्ये, मुंबईहूनदिल्लीला जाणाऱ्या विमानात मानवी बॉम्ब असून, तिच्याकडे दहशतवाद्यांचे ८० ते ९० लाख रुपये असल्याची माहिती देण्यात आली. दिल्ली पोलिसांकडून याबाबत माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. महिलेला अडकवण्यासाठी हा कॉल केल्याचा संशय असून, पोलिस तपास करत आहेत.
दिल्ली पोलिसांकडून मुख्य नियंत्रण कक्षात मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २४) रात्री ११ वाजता हा कॉल आला. त्यात, मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानातून गौरी नावाची महिला प्रवास करत असून, ती महिला वर्सोवा येथे राहते. ती दिल्लीवरून परदेशात जाणार असून, तिच्याकडे ८० ते ९० लाख रुपये आहेत. ते पैसे दहशतवाद्यांचे असून, ती मानवी बॉम्ब आहे. ही महिला प्रवासी परिचित व्यक्तीला भेटण्यासाठी लंडनला जात असल्याचेही कॉ़लरने दिलेल्या माहितीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेची वर्दी लागताच मुंबई पोलिसांना तपास कॉल आला होता. त्या महिलेची तपासणी केली. मात्र त्यात काही संशयास्पद आढळून आले नाही. महिलेला त्रास देण्यासाठी वैयक्तिक वादातून हा कॉल केल्याचा संशय असून, पोलिसांनी आता या कॉलरच्या दिशेने तपासाची सूत्रे फिरवली आहेत. याबाबत दिल्ली पोलिसांनादेखील माहिती देण्यात आली असून त्यांचेही सहकार्य घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आठवड्याभरात दहा गुन्हे...
आठवड्याभरात विमानामध्ये बॉम्ब संबंधित खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे, तर वैयक्तिक वादातून कॉल केल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी सहार पोलिसांनी केलेल्या कारवाईत अल्पवयीन मुलाला पकडले. त्याने मित्राला अडकवण्यासाठी खोटी माहिती दिल्याचे तपासात समोर आले होते.