Join us

Video : महिला पोलीस बनली सुईण; दादर रेल्वे स्थानकातच महिलेची प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 3:50 PM

रेल्वे स्थानकावरच प्रसूतीकळा सुरु झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिलेची सुखरूप प्रसूती झाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, पोलिसांच्या हजरजबाबीपणामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठळक मुद्देगीता दिपक सतय्या (वाघरे) ( वय-21)  या त्यांच्या पती व दोन लहान मुलांसह त्यांना पुणे येथे जाण्यासाठी आल्या होत्याअचानक त्यांना प्रसूतीवेदना होऊ लागल्या. पोलिसांच्या हजरजबाबीपणामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुंबई - दादर रेल्वे स्थानकातच एका महिलेची प्रसूती अचानक प्रवासादरम्यान झाली आहे. रेल्वे स्थानकावरच प्रसूतीकळा सुरु झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिलेची सुखरूप प्रसूती झाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, पोलिसांच्या हजरजबाबीपणामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

दादर रेल्वे स्थानकावर रविवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास  गीता दिपक सतय्या (वाघरे) ( वय-21)  या त्यांच्या पती व दोन लहान मुलांसह त्यांना पुणे येथे जाण्यासाठी आल्या होत्या. हे दाम्पत्य जेजुरी येथे राहते. फलाट क्रमांक 4 वर कँटीनजवळ गाडीची वाट पाहत बसल्या होत्या. अचानक त्यांना प्रसूतीवेदना होऊ लागल्या. हे पाहताच तिथे उपस्थित असलेल्या लोहमार्ग दलातील महिला पोलिसांनी गीता यांना त्वरित आश्रय देवून चादरीने चारी बाजूने बंदिस्त जागा केली. तसेच 108 क्रमांकावर संपर्क करून डॉक्टरांना पाचारण केले. यानंतर तिथेच गीता यांची प्रसूती झाली. त्यानंतर त्यांना व नवजात बालकाला तात्काळ सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. महिला व तिचे बाळ सुखरूप आहे. जीआरपीएफ महिला व पुरुष पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपणारी कामगिरी केल्याने गीता व तिच्या पतीने त्यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :दादर स्थानकरेल्वेपोलिसगर्भवती महिला