लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बीकेसी परिसरातील एका नाल्याजवळ मंगळवारी महिलेचा मृतदेह सापडल्याने मंगळवारी खळबळ उडाली. बलात्कारानंतर महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बीकेसीतील एमटीएनएल जंक्शन येथील नाल्याजवळ एका महिलेचा मृतदेह मंगळवारी आढळून आला. घटनेची वर्दी मिळताच बीकेसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच तिच्या गुप्तांगावर ही जखमा दिसून आल्या आहेत. त्यामुळे बलात्कारानंतर तिची हत्या केल्याचा संशय आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्या, बलात्कार प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहे.
प्राथमिक तपासात, मृत महिला देह विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. पैशांच्या वादातून हत्या करण्यात आल्याचा संशय असून पोलीस अधिक तपास करत आहे.
............................................