Join us

अश्लील मेसेज पाठविणाऱ्याला महिलेने शिकवला धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:39 AM

स्वाती (नावात बदल) या मालाडच्या कुरार परिसरात पतीसोबत राहतात.

- गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई : अनोळखी क्रमांकावरून आलेल्या ‘तू मला आवडतेस, मला तुझे फोटो पाठव’ या संदेशामुळे महिलेच्या भुवया उंचावल्या. मात्र घाबरून न जाता तिने शिताफीने संदेश पाठविणाºयाचा शोध घेत, त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा प्रकार कुरारमध्ये उघडकीस आला. यासाठी कुरार पोलिसांनी तिचे कौतुकही केले आहे.

स्वाती (नावात बदल) या मालाडच्या कुरार परिसरात पतीसोबत राहतात. बोरीवलीत एका खासगी कंपनीत त्या कार्यरत असून, १५ दिवसांपूर्वी त्यांच्याच परिसरात राहणाºया अमर किकुडवे (२५) नामक तरुणाशी त्यांची ओळख झाली होती. तो व्यवसायाने रिक्षाचालक असून, त्याने स्वातीच्या मोबाइलवर ‘तू मला आवडतेस’, ‘मला तुझे फोटो पाठव’ अशा आशयाचे मेसेज केले होते. सुरुवातीला अनोळखी क्रमांकावरून आलेल्या संदेशांकडे स्वातीने दुर्लक्ष केले. मात्र पुन्हा काही दिवसांनी तिच्या मोबाइलवर त्याच क्रमांकावरून अश्लील संदेश धडकले.

तेव्हा मात्र तिने ही बाब गंभीरतेने घेत यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्याचे ठरवले. त्यानुसार तिनेही किकुडवेसोबत चॅटिंग करण्यास सुरुवात केली. तीन ते चार दिवस त्याच्याशी गप्पा मारल्यानंतर तिने त्याला त्याचा फोटो पाठविण्याची विनंती केली. स्वातीला आपल्यात रुची निर्माण झाल्याचे किकुडवेला वाटले आणि त्याने मित्रासोबतचा त्याचा फोटो स्वातीला पाठविला.तो फोटो पाहिल्यावर सगळी बाब तिच्या लक्षात आली; आणि तिने या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत त्याला मंगळवारी अटक केली.

किकुडवेला पकडण्यासाठी स्वातीने योग्य ती हुशारी आणि हिंमत दाखविली. अन्यथा तिच्यासह कुटुंबालादेखील विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला असता. तिने अन्य महिला आणि मुलींसमोर एक चांगले उदाहरण ठेवले आहे,’’ अशा शब्दांत कुरार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाºयांनी तिचे कौतुक केले आहे.

टॅग्स :गुन्हेगारी