पुरुषाच्या स्पर्शामागचा हेतू स्त्रीला समजतो- उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:43 AM2020-03-04T04:43:31+5:302020-03-04T07:41:13+5:30
एखाद्या स्त्रीला कदाचित कमी समजत असेल पण पुरुषाने तिला स्पर्श केल्यानंतर किंवा तिच्याकडे बघितल्यानंतर तिला त्याचा हेतू लगेच समजतो,
मुंबई : एखाद्या स्त्रीला कदाचित कमी समजत असेल पण पुरुषाने तिला स्पर्श केल्यानंतर किंवा तिच्याकडे बघितल्यानंतर तिला त्याचा हेतू लगेच समजतो, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने अल्पवयीन अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या व्यावसायिकाच्या शिक्षेला स्थगिती दिली. तसेच त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली.
विमानात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ४१ वर्षीय व्यावसायिक विकास सचदेव याला सत्र न्यायालयाने १५ जानेवारी २०२० रोजी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली व त्याचवेळी त्याची जामिनावर सुटकाही. सचदेव याने २० फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या अपिलावरील सुनावणी न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे होती.
सचदेव याला त्याच्या आसनापुढे असलेल्या आसनावर पाय का ठेवावासा वाटला? एखाद्या स्त्रीला कदाचित कमी माहिती असेल; पण तिला जास्त समजते. स्पर्श, नजरेने तिला पुरुषाचा हेतू समजतो. ही तिला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे. पुरुषांना याबाबत समजत नाही. मात्र, स्त्रियांना त्यामागचा हेतू समजतो, असे न्यायालयाने म्हटले.
केवळ पीडित महिलाच पुरुषाच्या हेतूविषयी बोलू शकते. आरोपी कधीच मान्य करणार नाही की, त्याने जाणूनबुजून स्पर्श केला होता. तू (सचदेव) बिझनेस क्लासने प्रवास करत होतास. तिथे ऐसपैस जागा असताना तू तुझे पाय पीडितेच्या आसनावर का ठेवलेस, असा सवाल न्यायालयाने केला.
त्यावर अॅड. अनिकेत निकम यांनी न्यायालयाला सांगितले की, पीडितेने याबाबत केबिन क्रूकडे तक्रार केली नाही. उलट विमानातून हसत उतरली.
‘महिलांनी असे प्रसंग अनुभवल्यावर कसे वागावे किंवा प्रतिक्रिया द्यावी, याचे कोणतेही सूत्र नाही. हे गणित नाही. बस किंवा लोकलमधून प्रवास करताना असा प्रसंग अनुभवला नसणारी महिला विरळच,’ अशा शब्दांत न्यायालयाने सुनावले. ‘या अपिलावर लवकर सुनावणी घेतली जाईल, असे वाटत नाही आणि अर्जदाराला ठोठावण्यात आलेली शिक्षा कमी आहे. त्यामुळे या शिक्षेला स्थगिती देण्यात येत आहे,’ असे म्हणत न्यायालयाने विकास सचदेव याची २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्याच्या जामिनावर सुटका केली.
>अॅड. अनिकेत निकम यांचा युक्तिवाद
‘सत्र न्यायालयाने सचदेव याला दोषी ठरविण्यात चूक केली आहे. त्याच्या पायाचा स्पर्श पीडितेला झाला असेल तर ते चुकून झाले. जाणूनबुजून स्पर्श करण्यात आला नाही. तिचा छळ करण्याचा हेतू नव्हता,’ असा युक्तिवाद सचदेव याच्यातर्फे अॅड. अनिकेत निकम यांनी न्यायालयात केला.