मुंबई: गुरुवारी दुपारी २च्या सुमारास एका महिला निवासी डॉक्टरला फरीदा नामक महिलेने मारहाण केल्याचा प्रकार केईएम रुग्णालयात घडला. या घटनेला ४ दिवस उलटले असूनही पोलिसांनी फरीदाला अटक केलेली नाही.फरीदा नामक महिलेला लघवीला त्रास होत असल्यामुळे ती रुग्णालयात उपचारासाठी आली होती. तिच्या तपासण्यांचा अहवाल तिला दुपारी ४ वाजता देण्यात येईल असे तिला सांगितले होते. पण, त्या महिलेला दुपारी २ वाजताच तपासण्यांचा अहवाल हवा होता. पण, तरीही कोणाचेही न ऐकता फरीदा फाईल घेऊन आॅपरेशन थिएटरमध्ये शिरली. तेथेही तिने अहवाल द्या, असा तगादा लावला. आणि निवासी डॉक्टरच्या तोंडावर तीनदा फटके मारले, असे निवासी महिला डॉक्टरने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. फरीदाची प्रकृती बिघडल्यामुळे तिला सायन रुग्णालयात दाखल केल्याचे पोलीस सांगत आहेत. पण, त्या महिलेचा शोध लागलेला नाही. तिला पोलिसांनी पकडलेले नाही. यामुळे शासन निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीररीत्या पाहत नसल्याचे मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांचे म्हणणे आहे.
डॉक्टरला मारहाण करणारी महिला अद्याप फरार
By admin | Published: August 10, 2015 1:35 AM