Join us

दुष्काळातून वाचण्यासाठी मुंबईत आलेल्या महिलेने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 6:57 AM

गावी पडलेल्या दुष्काळामुळे जगणे कठीण झाले. अखेर, सून आणि नातवासह मुंबई गाठली. मुंबईत येऊन आठवडा होत नाही, तोच भरधाव वाहनाच्या धडकेत नगरच्या ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी कुर्ला येथे घडली.

मुंबई : गावी पडलेल्या दुष्काळामुळे जगणे कठीण झाले. अखेर, सून आणि नातवासह मुंबई गाठली. मुंबईत येऊन आठवडा होत नाही, तोच भरधाव वाहनाच्या धडकेत नगरच्या ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी कुर्ला येथे घडली. तिच्यासह आणखी एका तरुणाचा यात मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मिक्सर चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.हिराबाई मटकर चव्हाण (५०) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या मूळच्या अहमदनगर येथील शिवाजीनगरच्या साई राम सोसायटीत वास्तव्यास होत्या. गावात दुष्काळ पडल्याने रोजगाराच्या शोधात आठ दिवसांपूर्वी त्यांनी सून जलसा सुरेश चव्हाण (५०) आणि नातू दिनेश (१६) सोबत मुंबई गाठली. येथीलच टॅक्सीमेन कॉलनीच्या गेटसमोरील बीकेसीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला त्या पदपथावर राहत होत्या.गावी जगणे अशक्य झाले होते. अशात मुंबईत किमान दोन वेळचे जेवण तरी मिळेल. दुष्काळ संपेपर्यंत इथे थांबण्याचे हिराबाईने ठरविले होते. मुंबई त्यांच्यासाठी नवीन, त्यात येथील रस्तेही नवीन होते.बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास रोजगाराच्या शोधात, रस्ता ओलांडत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासह आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला. मिक्सर चालकाने तेथून पळ काढला.स्थानिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. चव्हाण कुटुंबीयांवर शोककळा पसरली.दुष्काळातून वाचण्यासाठी गाठलेल्या मुंबईत मरण ओढवल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांचा मृतदेह घेऊन सून आणि नातू पोलिसांच्या मदतीने गुरुवारी आपल्या गावाकडे रवाना झाले आहेत. अपघातात मरण पावलेल्या पुरुषाची ओळख अद्याप पटलेली नाही.कुर्ला पोलिसांनी ठोकल्या चालकाला बेड्याकुर्ला पोलिसांनी या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या दोन तासांत घाटकोपरच्या सुंदर बाग रोड परिसरातून मिक्सरचा (क्रमांक एम एच ०४ जे के ०६६१) चालक अवधराज भारती याला बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :मृत्यूअपघात