विवाहेच्छुक मुलांची स्थळे दाखवण्याचे आश्वासन देऊन मुलीला एकही स्थळ न दाखवणाऱ्या महिलेला ग्राहक मंचाचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 06:14 AM2021-09-29T06:14:50+5:302021-09-29T06:15:49+5:30
वधूला ५५ हजार रुपये परत करण्याचे ग्राहक मंचाचे आदेश
मुंबई : दरमहा १५ विवाहेच्छुक मुलांची स्थळे दाखवण्याचे आश्वासन देऊन मुलीला एकही स्थळ न दाखवणाऱ्या महिलेला ग्राहक मंचाने चांगलाच दणका दिला. मुलीकडून घेतलेले ५५ हजार रुपयांचे शुल्क परत करण्याचे व ५००० रुपये दंड, असे मिळून मुलीला एकूण ६० हजार रुपये देण्याचे आदेश विवाह जुळवणाऱ्या व्यक्तीला दिले.
रिया मेहता (बदललेले नाव) यांच्याविरोधात एका महिलेने आठ वर्षांपूर्वी ग्राहक मंचात तक्रार केली होती. संबंधित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, रिया मेहता यांनी मुलीला दरमहा १५ स्थळांचे प्रोफाइल आणि फोटोग्राफ पाठविणे तसेच मुलाच्या पालकांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने तक्रारदार मुलीने जुलै २०१२ मध्ये मेहता यांची सेवा स्वीकारत ५५ हजार रुपयांचा चेक दिला. पण त्यानंतर मेहता यांनी आश्वासन न पाळल्याने तक्रारदार मुलीने व तिच्या वडिलांनी मेहता यांना अनेक ई-मेल केले. मात्र, सेवेमध्ये काहीही बदल झाला नाही. अखेरीस मुलीने तिची सेवा बंद करीत शुल्क परत करण्यास सांगितले होते. मात्र, शुल्क परत न केल्याने मुलीने मेहता यांच्याविरोधात ग्राहक मंचात तक्रार केली होती. मेहता यांनी सेवेत कसूर केल्याने त्यांना दोषी ठरवावे आणि पैसे परत करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी तक्रारदार मुलीने केली होती.
आश्वासनानुसार सेवा देण्यात कसूर
- सुरुवातीला मेहता यांच्यावतीने मंचापुढे वकील हजर राहिले. मात्र, काही दिवसांनी त्यांनी सुनावणीस येणे बंद केले.
- मंचाने मेहता यांच्या व्हिजिटिंग कार्डची दखल घेतली. या कार्डवर सुशिक्षित, एनआरआय सदस्यांसाठी ‘मॅचमेकर’ असल्याचे नमूद केले आहे. मेहताने सेवा देण्यात कसूर केली आहे, असे मत मंचाने नोंदविले.