मुंबई - दादरवरून कर्जत फास्ट लोकल पकडताना चोरीला गेलेले महिलेचे मंगळसूत्र पाच दिवसांमध्ये शोधून देण्यात लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपीने) यश आले आहे. याप्रकरणी बुरखा घालून वेशांतर केलेल्या महिलेला आणि तिच्या साथीदाराला जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून हस्तगत केलेले साडेसात ग्राम सोन्याचे मंगळसूत्र बदलापूरच्या प्रियांका सोनवले यांना जीआरपीच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी परत केले. आरोपी महिलेने याआधी ठाणे, कुर्ला रेल्वे पोलिस ठाणे हद्दीत ६ गुन्हे केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.
दादर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक १० वर संध्याकाळी साडेसहाची कर्जत जलद लोकलमध्ये चढताना या महिलेचे मंगळसूत्र चोरीस गेले होते. त्याची तक्रार दादर लोहमार्ग पोलीस ठाण्यात (जीआरपी) २५ ऑक्टोबरला नोंदविण्यात आली. चोरी करणाऱ्या महिलेने बुरखा घातल्यामुळे पोलिस तपासात अडचण येत होता. गुन्ह्याची उकल करण्यासाठी दादर लोहमार्ग पोलिस उपनिरीक्षक रमेश सिद्राम सूर्यवंशी यांच्या पथकाने स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बुरखाधारी महिलेचा माग काढला.
सँडल पाहून लावला छडापोलिसांनी महिलेला तिच्या पायातील सँडल आणि साथीदाराच्या स्कूटरच्या आधारे दिव्यामध्ये एका इमारतीत जात असल्याचे पाहिले. आणि पाच दिवसांच्या आत या गुन्ह्याची उकल करत दोघांनाही अटक केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.