‘त्या’ महिलेचा जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 06:21 AM2018-12-02T06:21:04+5:302018-12-02T06:23:39+5:30
एका १७ वर्षीय मुलाशी लग्न करणाऱ्या २२ वर्षीय महिलेचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने शनिवारी फेटाळला.
मुंबई : एका १७ वर्षीय मुलाशी लग्न करणाऱ्या २२ वर्षीय महिलेचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने शनिवारी फेटाळला. या महिलेला एक मुलगी आहे. पोलिसांनी तिच्यावर पॉक्सो, अपहरण आणि बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
अल्पवयीन मुलाच्या आईने गेल्या वर्षी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली. वर्षभर तपास केल्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली. महिलेला पाच वर्षांची मुलगी असून, तीही सध्या तिच्याबरोबर भायखळा कारागृहात आहे.
लग्नाच्या वेळी मुलगा १७ वर्षे ८ महिन्यांचा असल्याचा मुलाच्या आईचा दावा खोटा आहे. तक्रारदार महिलेला तीन मुले असून, पहिली मुलगी २० वर्षांची असून, दुसरी १८ वर्षांची आहे. मग तिसरा मुलगा १७ वर्षे ८ महिन्यांचा कसा, असा सवाल संबंधित महिलेने उपस्थित केला, तसेच नवºयाशी असलेले नाते दोघांच्या सहमतीने आहे, असे महिलेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. सत्र न्यायालयात या जामीन अर्जावरील सुनावणी इन-कॅमेरा घेतली. न्यायालयाने महिलेची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला.
अल्पवयीन मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, संबंधित महिलेचा यापूर्वी दोनदा घटस्फोट झाला आहे. मुलाचे वय लग्नाच्या वेळी १७ वर्षे ८ महिने इतके होते. एके दिवशी ही महिला रात्री अचानक आपल्या घरी आली आणि आपली सून असल्याचे सांगू लागली. तुमच्या मुलाशी माझा विवाह झाला असून मी याच घरात राहणार, असा दावा करू लागली. याला मुलाच्या घरच्यांनी विरोध केला असता, संबंधित महिलेबरोबर असलेल्या नातेवाइकांनी दमदाटी करत स्वत:ला इजा करण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलगाही घर सोडून महिलेसह गेला.