मरिन ड्राइव्ह येथील समुद्रात उडी घेत एका तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एक तरुणी समुद्रात बुडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मरिन ड्राइव्ह पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. समुद्रातून तरुणीला बाहेर काढण्यात आलं आणि जी.टी. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. पण तोवर खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं.
तरुणीनं समुद्रात उडी घेण्याआधी तिची बॅग तिथंच टाकली होती. बॅगमध्ये तिचं ओळखपत्र सापडलं असून तिचं नाव ममता प्रवीण कदम (२३) असल्याचं समोर आलं आहे. तरुणी अंधेरी येथील असून ती एका प्रसिद्ध आयटी कंपनीत कामाला होती. कामावर जात असल्याचं सांगून ती घराबाहेर पडली होती. पण कामावर न जाता तिनं मरिन ड्राइव्ह स्थानक गाठलं. इंटरकॉन्टीनेंटल हॉटेल समोर तिनं समुद्रात उडी घेतली. उडी घेण्याआधी बॅग काढून ठेवली. या बॅगेत तिचा लॅपटॉप, मोबाइल, दागिने आढळून आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून वैयक्तिक कारणातूनच तिनं आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. मरिन ड्राइव्ह पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.