सी-लिंकवर महिलेची दादागिरी
By admin | Published: September 27, 2016 04:08 AM2016-09-27T04:08:54+5:302016-09-27T04:08:54+5:30
वांद्रे - वरळी सी लिंकवर एका सुरक्षा रक्षकाला सँडलने मारण्यात आले. हा प्रकार गेल्या गुरुवारी रात्री घडला असून वांद्रे पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
मुंबई : वांद्रे - वरळी सी लिंकवर एका सुरक्षा रक्षकाला सँडलने मारण्यात आले. हा प्रकार गेल्या गुरुवारी रात्री घडला असून वांद्रे पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
शबिना खत्री ऊर्फ सिमरन (३०) असे या मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव असून ती ओशिवऱ्याची राहणारी आहे. इकबाल खत्री या बिल्डरची पत्नी असलेली खत्री २२ सप्टेंबर रोजी वरळीतून ओशिवरा परिसरात असलेल्या तिच्या घरी सी लिंकमार्गे परतत होती. उरण परिसरात तीन अतिरेकी उतरल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्यामुळे शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त होता. ज्यात सिलिंकचाही समावेश होता. खत्रीने तिची कार भरधाव वेगाने टोल प्लाझावर फास्ट लेनमधुन काढण्याचा प्रयत्न केला. तिच्या या संशयास्पद वागण्याने याठिकाणी असलेल्या विशाल गवस (२६) या सुरक्षा अधिकाऱ्याने तिला आडवीले. तेव्हा तिने गवस यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तसेच तिने त्यांच्या गळ्यातील ओळखपत्र देखील खेचत नंतर त्यांना सँडलने मारहाण करण्यास सुरवात केली. गवस यांचे अन्य सहकारी त्यांच्या मदतीला येईपर्यंत खत्री त्यांना मारत होती असे सुत्रांचे म्हणणे आहे. ही बाब सी लिंकच्या सीसी टीव्हीत कैद झाली आहे.
सिलिंकवर सुरक्षारक्षकाला सँडलने मारण्याची घटना गुरुवारी रात्री घडली. त्यानुसार आम्ही या महिलेवर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. तिला त्याचवेळी ताब्यातही घेण्यात आले मात्र महिला असल्याने दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश देत सोडण्यात आले. मात्र ती अद्याप हजर झालेली नाही.
याबाबत बहात्तर तासांपुर्वी तिच्या लोखंडवाला या घरी नोटीसही बजावण्यात आली आहे. ज्याचा कालावधी आता संपला असुन आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत, अशी माहिती बांद्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत ठाकरे यांनी दिली.