मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिलेची ट्रॉलीवरील पर्स लांबवल्याची घटना उघडकीस आली.दरम्यान, पर्स न सापडल्याने सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर चोर सापडला. हा चोरटा खासगी कार्गो कंपनीचा कर्मचारी असल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी सहार पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार आकाश मोकळ (२५) हे विमानतळाची सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या खासगी कंपनीत पर्यवेक्षक आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी इंडिगो या विमानाने दिल्ली ते मुंबई प्रवास केलेले प्रवासी विनोदकुमार गर्ग यांना घेण्यासाठी त्यांची मुलगी संगीता या विमानतळावरील आल्या. वडिलांना रिसिव्ह केल्यावर त्या १:५० च्या पार्किंग परिसरात आल्यावर त्यांची ट्रॉलीवरील पर्स त्यांना सापडत नव्हती.
सर्वत्र शोधल्यावर ती न मिळाल्याने ती चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी एक जण त्यांची पर्स घेऊन जात असताना त्यांना दिसला. तपास केल्यानंतर पर्स चोरणारा सापडला. त्याचे नाव सुनील मिरेकर असून एका खासगी कार्गो कंपनीचा तो कर्मचारी असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.