‘त्या’ महिलेचा मुलगा गायब, पोलीस कुटुंबीयही ‘नॉट रिचेबल’, रिया पालांडे आत्महत्या प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 02:21 AM2017-11-26T02:21:02+5:302017-11-26T02:21:10+5:30

पोलीस जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या रिया पालांडे (४७) या महिलेचा मुलगा शुभम् शुक्रवारी रात्रीपासून गायब झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी मिसिंगची तक्रार नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे.

The woman's son disappeared, the police's family too 'Not Reachable', Riya Palande Suicide Case | ‘त्या’ महिलेचा मुलगा गायब, पोलीस कुटुंबीयही ‘नॉट रिचेबल’, रिया पालांडे आत्महत्या प्रकरण

‘त्या’ महिलेचा मुलगा गायब, पोलीस कुटुंबीयही ‘नॉट रिचेबल’, रिया पालांडे आत्महत्या प्रकरण

Next

मुंबई : पोलीस जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या रिया पालांडे (४७) या महिलेचा मुलगा शुभम् शुक्रवारी रात्रीपासून गायब झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी मिसिंगची तक्रार नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे. दुसरीकडे पोलीस कुटुंबीयांचाही शोध पोलीस घेत आहेत. शनिवारपासून हे कुटुंबीय नॉट रिचेबल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गेल्या चार वर्षांपासून मुलुंड पूर्वेकडील समर्थ व्हिलामध्ये रिया पालांडे, मुलगा शुभम् आणि मुलगी श्रद्धासोबत भाडेतत्त्वावर राहत होत्या. रिया या पूर्वी गव्हाणपाडा परिसरात राहत होत्या. त्या व्याजाने पैसे द्यायच्या. मात्र मधल्या काळात व्याज न मिळाल्याने हे व्यवहार बंद पडल्याचे समजते. गुरुवारी पालांडे यांनी पोलीस कुटुंबाच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली. तसे सुसाईड नोटमध्ये त्यांनी नमूद केले. या प्रकरणी एलए ४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दामोदर चौधरी, पोलीस पत्नी भारती चौधरी आणि मुलगी मीनाक्षी यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आईचा अंत्यविधी झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळपासून त्यांचा मुलगा शुभम् घरातून बॅग घेऊन बाहेर पडला. त्यानंतर त्याच्याशी संपर्क तुटल्याने रात्री त्याच्या बहिणीने नवघर पोलिसांत तक्रार दिली.
पोलिसांनी मिसिंग तक्रार नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. त्याचे शेवटचे लोकेशन मुलुंड पश्चिमेकडील येत आहे. तेथून तो कुठे गेला? त्याने मोबाइल का बंद केला? अशा
अनेक प्रश्नांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी अधिक माहिती देण्यास नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधव मोरे यांनी नकार दिला.
गुन्हा दाखल झाल्यापासून चौधरी कुटुंब नॉट रिचेबल आहे. शुक्रवारी दामोदर चौधरी कामावर हजर होते. मात्र, शनिवारी कामावर काहीही माहिती न देता ते गैरहजर राहिले. तसेच मुलुंड पोलीस ठाणे इमारतीतील त्यांचे घरही बंद आहे. तिघांचेही मोबाइल बंद आहेत. ते कुठे आहेत? किंवा त्यांचे शेवटचे लोकेशनही अद्याप पोलिसांना सापडत नसल्याचे नवघर पोलिसांचे
म्हणणे आहे. अचानक संपर्कात असलेले पोलीस संपर्काबाहेर कसे गेले? ते कुठे आहेत? यामागचे गूढही कायम आहे. दरम्यान या प्रकरणी रिया यांची मुलगी श्रद्धा हिचा शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी जबाब नोंदविला आहे.

चौधरी कुटुंबाकडून दमदाटी
रिया पालांडे आणि भारती चौधरी यांच्यात ३० लाखांच्या व्यवहारावरून वाद होता. पैशांच्या वसुलीसाठी चौधरी दाम्पत्य त्यांच्या मुलुंड पश्चिमेकडील श्रद्धा जनरल स्टोर्समध्ये जाऊन दमदाटी करत होते. अन्य दुकानदारांसमोर होत असलेली बदनामी, त्यात भररस्त्यात अडवून मिळत असलेल्या धमक्यांमुळे पालांडे मानसिक तणावाखाली होत्या. आत्महत्येपूर्वीही चौधरी कुटुंबाने त्यांच्या दुकानात जाऊन त्यांना दमदाटी केल्याचे समजते. या प्रकरणी नवघर पोलीस अधिक तपास करत आहेत.

चौकशी सुरू
मुलगा हरविल्याबाबत आलेल्या तक्रारीवरून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांनी दिली.

Web Title: The woman's son disappeared, the police's family too 'Not Reachable', Riya Palande Suicide Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा