Join us

बाइकवरून राज्यभर भटकंती करण्यात महिलाही अग्रेसर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 6:36 AM

वैशाली माटवकर । स्त्रियांना कमी न समजण्याचा दिला संदेश, दहा दिवसांत साडेतीन हजारांचा प्रवास पूर्ण

सागर नेवरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुली या बाइक चालवू शकत नाहीत, असा गैरसमज आहे, तो दूर करण्यासाठीच बाइकवरून रायडिंग करून अंधेरीतील वैशाली माटवकर हिने दहा दिवसांत साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. स्त्रियांना कमी समजू नका. सोबतच बाइक किंवा कोणतेही वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पाळा, असा संदेश देत वैशाली व तिच्या ग्रुपने राज्यभरात जनजागृती केली.बाइक रायडर वैशाली माटवकर हिने मुंबई-बंगळुरू-पाँडिचेरी- कोइम्बतूर-म्हैसूर-गोवा असा दहा दिवसांचा प्रवास बाइकवरून केला. एमकॉमचे शिक्षण घेतलेल्या वैशालीला लहानपणापासूनच बाइकचे वेड होते. २८ नोव्हेंबर, २०१९ रोजी रात्री ११ वाजता तिने मुंबईतून राइडला सुरुवात केली. यावेळी तिच्यासह १५ बाइक रायडर होते. यात वैशालीसह अन्य एक महिला व इतर पुरुष सहकारी होते. २०० किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर त्यांनी थोडा ब्रेक घेतला. प्रवास करताना ते तामिळनाडूत पोहोचले, तेव्हा त्यांना पावसाने गाठले. पावसामुळे कोस्टल एरियात जाता आले नाही. त्यावेळी प्लॅनिंगमध्ये बदल करून ते कोइम्बतूरला निघाले. तेथे कोली हिल्सला गेले. कोली हिल्स हा वाकड्या-तिकड्या वळणाचा धोकादायक रस्ता सुरक्षितरीत्या पार केला. गोवा ते मुंबई असा परतीचा प्रवास त्यांनी १२ तासांत पूर्ण केला.सध्या बऱ्याच मुली रायडिंगमध्ये उतरत आहेत. राज्य व जगाभरात रायडिंग करून तेथील संस्कृती, वेषभूषा, चालीरीती आदी जाणून घेत आहेत. मुली या बाइक चालवू शकत नाहीत, हा गैरसमज लोकांमध्ये रूढ झालेला असतो. तो खोडून काढण्यासाठी रायडिंगमध्ये सहभागी झाल्याचे वैशालीने सांगितले. माझ्यासोबत बरेच अनुभवी रायडर्स होते. रायडिंगदरम्यान त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. चार राज्यांमधला रायडिंगचा अनुभव हा माझ्यासाठी अविस्मरणीय होत, असे ती म्हणाली.रायडिंग करताना वाहतुकीचे सगळे नियम पाळले जातात आणि ते पाळणे गरजेचे आहे, तरच बाइक किंवा कोणतेही वाहन चालविताना अपघात टाळून सुखरूप प्रवास करता येतो, असे ती म्हणाली.संकटांचा यशस्वी सामना करण्याचा मिळाला अनुभववैशालीने सांगितले की, प्रवासादरम्यान संकटांचा यशस्वीपणे सामना करण्याचा अनुभव मिळाला. एका रायडरची दुचाकी बंद पडली. त्या दुचाकीचे पार्टस कुठेही मिळत नव्हते. त्यामुळे त्या रायडरला तामिळनाडूमध्येच थांबावे लागले. मग त्याने दुसरा मार्ग निवडून प्रवास पूर्ण केला. माझ्या दुचाकीच्या गिअर बॉक्सचा नट पडला होता. त्यामुळे चढण-उतरणीवर गिअर पडत नव्हते. दुचाकी चालविताना गिअर बॉक्स निकामी झाल्याने अनेक समस्या उद्भवल्या, परंतु कमी वेग ठेवून १०० किलोमीटरपर्यंत दुचाकी चालविली, मग दुचाकीचा गिअर बॉक्स दुरुस्ती करून पुढील प्रवास सुरू केला.