मुंबईतील महिला व बाल असुरक्षितच, प्रजाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 01:32 AM2019-03-06T01:32:14+5:302019-03-06T01:32:27+5:30

मुंबईत बलात्कार आणि विनयभंगासह बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणांत गेल्या पाच वर्षांत झपाट्याने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Women and Child Unprotected, Report of the People in Mumbai | मुंबईतील महिला व बाल असुरक्षितच, प्रजाचा अहवाल

मुंबईतील महिला व बाल असुरक्षितच, प्रजाचा अहवाल

Next

मुंबई : मुंबईत बलात्कार आणि विनयभंगासह बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणांत गेल्या पाच वर्षांत झपाट्याने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रजा फाऊंडेशन संस्थेने मुंबई प्रेस क्लबमध्ये मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती अधिकारात मिळवलेली माहिती दिली. त्यानुसार मुंबईत २०१३-१४ ते २०१७-१८ या पाच आर्थिक वर्षांत बलात्काराच्या घटनांत ८३ टक्के आणि विनयभंगाच्या प्रकरणांत ९५ टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे.
प्रजाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पाच वर्षांपूर्वी नोंदवण्यात आलेल्या ४३२ बलात्कारांच्या घटनांत २०१८-१८मध्ये ७९२ इतकी वाढ झाली आहे. तर विनयभंगाच्या प्रकरणातही १ हजार २०९ वरून २ हजार ३५८ म्हणजेच तब्बल दुप्पट वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय मुंबईत बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणातही गेल्या तीन वर्षांत १९ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. २०१५-१६मध्ये पॉस्को अंतर्गत ८९१ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यात २०१७-१८मध्ये १ हजार ०६२ इतकी वाढ झाली आहे. त्यात ५४ तक्रारी मुलांनी, तर १ हजार ०२० तक्रारी मुलींकडून नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील महिलांसह लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, खुन आणि वाहन चोरीच्या प्रकरणांत घट झाल्याचे समोर आले आहे. खुनांच्या घटनांत १७१ वरून ११५पर्यंत, तर वाहन चोरीच्या घटनांत ३ हजार ७९३वरून ३ हजार २४५ घटनांची घट झाली. यासह घरफोडीच्या घटनांतही १९ टक्क्यांनी घट झाल्याचे या माहिती उघड होते.
।साखळी चोरांना चाप
सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी लावण्यात येणाऱ्या नाकाबंदीमुळे सोनसाखळी चोरीच्या घटनांना चाप लागल्याची माहिती या अहवालात समोर आली आहे. पाच वर्षांपूर्वी मुंबईत सोनसाखळी चोरीच्या तब्बल २ हजार ११० घटना नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र त्यात तब्बल ९२ टक्क्यांनी घट झाली असून २०१७-१८मध्ये सोनसाखळीच्या केवळ १६२ तक्रारींची नोंद आहे.
।गुन्हेगारीविरोधात
आमदार आक्रमक
मुंबईतील गुन्हेगारीविरोधात येथील आमदारांनी विधानसभेत जोरदार आवाज उचलल्याचे दिसते. २०१४-१५मध्ये मुंबईतील आमदारांनी येथील गुन्हेगारीवरून १२३ प्रश्न उपस्थित केले होते. त्यात २०१७-१८मध्ये तब्बल ९४६ प्रश्नांपर्यंत वाढ झाली आहे.

Web Title: Women and Child Unprotected, Report of the People in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.