मुंबई : स्वच्छता आणि आरोग्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले होते. मोदी सरकारने मात्र स्वच्छता आणि आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, मागील सात वर्षांत यादृष्टीने मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. त्यासाठीच पोषण अभियानाला एका क्रांतिकारक बदलाचे स्वरूप दिल्याचे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले.
पोषण महिना अभियानांतर्गत सोमवारी केंद्रीय मंत्री नक्वी आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईतील विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. नवा भारत घडविण्यासाठी देशातील बालके आणि महिला सुदृढ आणि निरोगी असायला हवीत, त्यासाठी पोषणमास अभियान महत्त्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये जनतेच्या आरोग्याशी, स्वास्थ्याशी तसेच सुखरूपतेशी संबंधित विषयांची जनजागृती करण्यासाठी कोणत्याही सरकारने क्रांती आणि अभियान कार्यक्रमाला परिणामकारक मोहिमेच्या स्वरूपात चालविले नाही. मोदी सरकारने मात्र सर्व लोकप्रतिनिधी, राज्य सरकारे, केंद्रातील संबंधित मंत्रालये यामधील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हे पोषण अभियान छेडले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहभाग घ्यावा आणि लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवावी, अशी पंतप्रधान मोदी यांची भूमिका आहे. अभियान आपल्या येणाऱ्या पिढ्यांना अधिक सशक्त, निरोगी तसेच अधिक मजबूत करण्यासाठी मदत करेल. तसेच ज्या नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, त्यालाही अभियानाचा मोठा हातभार लागेल, असे नक्वी यांनी सांगितले.
नक्वी पुढे म्हणाले ‘डिसिजन विथ डिलिव्हरी’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा संकल्प आहे. नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर काम करीत आहे. मागच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय डिजिटल कार्यक्रम सुरू करण्यात आला. यातून प्रत्येक भारतीयाला आरोग्य कार्ड दिले जाणार आहे. जन आरोग्य योजनेंतर्गत २.११ कोटी लोकांवर मोफत उपचार करण्यात आले. २०१४ पासून १५ एम्स रुग्णालयांना मान्यता देण्यात आली. तर वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ३८१ वरून ५६५ झाली आहे. बाल विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. मिशन इंद्रधनुष्यअंतर्गत चार कोटी बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. वर्षभरापूर्वी कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी देशात आवश्यक संसाधने नव्हती. आता या आघाडीवर देश स्वावलंबी बनला आहे. जगातील सर्वात मोठे मोफत लसीकरण भारतात सुरू आहे. ६९ कोटी लोकांनी आतापर्यंत लस घेतल्याचे नक्वी म्हणाले.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, खासदार पूनम महाजन, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, राहुल शेवाळे, आमदार मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच अंजुमन-इ-इस्लामचे अध्यक्ष डॉ. जहीर काझी, बॉम्बे पारसी पंचायत अध्यक्ष अरमायती तिरंदाज यांच्यासह सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी मुंबईतील विविध ठिकाणच्या पोषण अभियान जनजागृती मोहिमेला उपस्थिती लावली.