मालवाहू जहाजाचे सारथ्य महिलांच्या हाती; जेएनपीटी बंदरातून समुद्रसफरीला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:07 AM2021-03-08T04:07:07+5:302021-03-08T04:07:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उरण : महिला दिनानिमित्त भारतीय स्त्री सामर्थ्याचे दर्शन संपूर्ण जगाला घडावे याउद्देशाने केंद्रीय नौकानयन मंत्रालयाने विशेष ...

Women are in charge of the cargo ship; Departure by sea from JNPT port | मालवाहू जहाजाचे सारथ्य महिलांच्या हाती; जेएनपीटी बंदरातून समुद्रसफरीला रवाना

मालवाहू जहाजाचे सारथ्य महिलांच्या हाती; जेएनपीटी बंदरातून समुद्रसफरीला रवाना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उरण : महिला दिनानिमित्त भारतीय स्त्री सामर्थ्याचे दर्शन संपूर्ण जगाला घडावे याउद्देशाने केंद्रीय नौकानयन मंत्रालयाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत एका मालवाहू जहाजाचे संपूर्ण नियंत्रण महिलांच्या हाती देण्यात आले आहे. जेएनपीटी बंदरातून शनिवारी हे जहाज गुजरात राज्यातील वाडीनार बंदराकडे रवाना झाले.

‘स्वर्ण कृष्णा’ असे या मालवाहू जहाजाचे नाव असून, त्याचे संचलन पूर्णत: महिलांच्या हाती देण्यात आले आहे. केंद्रीय नौकानयनमंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी दूरचित्रसंवाद माध्यमातून या जहाजाला हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता हे मालवाहू जहाज जेएनपीटी बंदरातून गुजरात राज्यातील वाडीनार बंदराकडे रवाना झाले.

जहाजावर महिला अधिकारी किंवा कर्मचारी तैनात असणे ही वेगळी गोष्ट, परंतु एखाद्या मालवाहू जहाजाचे नियंत्रण पूर्णत: महिलांच्या हाती देण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग आहे. महिला दिनानिमित्त भारतीय नारी शक्तीचा परिचय जगाला करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राब‌विण्यात आल्याची माहिती मांडविया यांनी दिली.

स्त्री सामर्थ्याचे दर्शन

मालवाहू जहाजाचे नियंत्रण हे सामान्यत: एखाद्या तज्ज्ञ आणि अनुभवी कॅप्टनकडे देण्यात येते. कारण इतके अवजड जहाज हाकण्यासाठी विशेष कौशल्याची गरज असते. त्यामुळे इतकी मोठी जबाबदारी महिलांच्या हाती देऊन केंद्रीय नौकानयन मंत्रालयाने भारतीय स्त्रियांच्या सामर्थ्याचे दर्शन संपूर्ण जगाला घडवून दिल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर अनेकांनी व्यक्त केली.

Web Title: Women are in charge of the cargo ship; Departure by sea from JNPT port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.