महिला, वृद्ध रुग्ण उपचारासाठी करतात उशीर
By admin | Published: September 29, 2015 01:36 AM2015-09-29T01:36:18+5:302015-09-29T01:36:18+5:30
छातीत धडधडणे, छातीत दुखणे, अवस्थ वाटणे अशी हार्ट अॅटॅकची सामान्य लक्षणे आहेत. मात्र अशा लक्षणांकडे महिला आणि वृद्ध दुर्लक्ष करत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे
मुंबई : छातीत धडधडणे, छातीत दुखणे, अवस्थ वाटणे अशी हार्ट अॅटॅकची सामान्य लक्षणे आहेत. मात्र अशा लक्षणांकडे महिला आणि वृद्ध दुर्लक्ष करत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. याविषयी ते कोणालाही लवकर माहिती देत नाहीत. त्यामुळे एका तासात म्हणजे गोल्डन
अवरमध्ये उपचार न झाल्याने त्यांचा आजार बळावतो. १७ टक्के व्यक्तींमध्ये ही लक्षणे दिसून आल्यावर सरासरी दोन तासांत ते रुग्णालयात पोहोचतात, असे निरीक्षण सायन रुग्णालयातील हृदयविकार विभागाचे प्रा. डॉ. अजय महाजन यांनी नोंदवले आहे.
महिला, वृद्ध उशिरा रुग्णालयात पोहोचल्याने धोका वाढतो. हृदयातील धमण्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या
होतात. या गुठळ्या अधिक काळ तशाच राहिल्यास धोका वाढत जातो. हे टाळण्यासाठी गुठळ्या विरघळवणारे अत्यंत महत्त्वाचे जीवनदायी
औषध दिले जाते. उशिरा पोहोचल्यास हे औषध मिळण्यास उशीर होतो.
डॉ. महाजन यांनी सांगितले, हृदयविकाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे, त्रास थांबेल याची वाट पाहणे, घरच्यांवर बोजा नको असा विचार करणे, उपचारांची भीती अथवा लाज वाटणे, आर्थिक समस्या ही महिला रुग्णालयात उशिरा येण्याची प्रमुख कारणे आहेत. (प्रतिनिधी)
---------
मुंबईतील तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकार
च्हृदयविकारामुळे अतिदक्षता विभागात तरुण-तरुणी दाखल होणे, ही बाब आता नवीन राहिलेली नाही. धूम्रपान आणि तंबाखूसेवन, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, साखरेचे वाढते प्रमाण या कारणांमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
च्तरुणांमध्ये होणाऱ्या हृदयविकारामुळे देशातील कार्यक्षम लोकसंख्या कमी होत आहे, असे सायन रुग्णालयातील हृदयविकार विभागाचे प्रा. डॉ. अजय महाजन यांनी सांगितले.
-----------