लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चांदीचे पैंजण खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफा दुकानात शिरून पैंजण लंपास करण्याचा प्रकार कांदिवलीमध्ये घडला. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अवघ्या काही तासात दोन महिलांना अटक केली आहे.
उषाबाई मकाळे (५०) आणि सुगंधाबाई मकाळे (६०) अशी अटक केलेल्या दोघींची नावे आहेत. त्या मूळच्या नाशिकच्या राहणाऱ्या असून, बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात मजुरी काम करतात. कांदिवलीच्या लालजीपाड्यात मंगलमूर्ती ज्वेलर्स हे दुकान आहे. तक्रारदार भरत जोशी (३३) हे २१ जून २०२१ रोजी दुकानात असताना आरोपी महिला तेेथे आल्या. त्यांनी जोशी यांना पैंजण दाखविण्यास सांगितले. त्यांनी पैंजण दाखवल्यानंतर त्यातील एक जोडी त्यांनी पसंत करत जोशी यांना वजन करण्यास सांगितले. जोशी वजन करण्यासाठी मागे वळले आणि पैंजण ३ हजार ८०० रुपयांचे असल्याचे सांगितले.
पैंजण महाग असल्याचे सांगत त्या निघून गेल्या. त्यानंतर दागिने आवरताना एक पैंजणची जोडी गायब असल्याचे जोशी यांच्या लक्षात आले आणि त्यांनी कांदिवली पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने त्या दोघींचा शोध घेतला. मालाडमधील एका ज्वेलरी शॉपजवळ त्या फिरत असताना पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपशिखा वारे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक सूर्यकांत पवार यांनी याप्रकरणी तपास करत आरोपी महिलांना अवघ्या काही तासात गजाआड केले.
...............................................