मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विश्वस्तपदी महिला, १५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 11:07 AM2022-05-26T11:07:56+5:302022-05-26T11:08:38+5:30

१५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी

Women as trustees of Mumbai Port Trust | मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विश्वस्तपदी महिला, १५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विश्वस्तपदी महिला, १५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी

googlenewsNext

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या १५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कामगार विश्वस्तपदी महिलेला संधी मिळाली आहे. केंद्रीय नौकानयन मंत्रालयाच्या सूचनेनुसार मुंबई पोर्ट प्राधिकरणाने नुकतेच कल्पना देसाई यांना निवडपत्र बहाल केले.

३ नोव्हेंबर २०२१ पासून देशभरात ‘मेजर पोर्ट ॲथॉरिटी ॲक्ट’ची अंमलबजावणी सुरू झाली. पूर्वीच्या कायद्यात विश्वस्त मंडळावर कामगार प्रतिनिधी असावेत, असे बंधन नव्हते. नव्या कायद्यात, सेवेत असलेले दोन कामगार प्रतिनिधी विश्वस्त मंडळावर नेमले जावेत, असा नियम अंतर्भूत करण्यात आला. त्यानुसार ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन या मान्यताप्राप्त संघटनांनी आपल्या दोन प्रतिनिधींची शिफारस मुंबई पोर्ट ट्रस्टकडे केली. त्यानंतर ही नावे केंद्रीय नौकानयन मंत्रालयाला पाठविण्यात आली. तेथे अंतिम मोहोर उमटल्यानंतर कल्पना देसाई आणि दत्ता खेसे यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

गेली ४० वर्षे सेवा बजावणाऱ्या कल्पना देसाई या १९८२ साली मुंबई पोर्ट ट्रस्टच्या लेखा विभागात रुजू झाल्या. नेतृत्व कौशल्याच्या बळावर त्यांना आय.एल.ओ., आय.टी.एफ.च्या वतीने लंडन, जपान, स्पेन, नेपाळ व इतर देशांत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली. शासनातर्फे १९९७ साली त्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित केले. २००० मध्ये महापौरांच्या हस्ते ‘बेस्ट सिटीझन ऑफ मुंबई’ पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार, अष्टगंध पुरस्काराने त्यांना गौरविले आहे. 

सद्य:स्थितीत मेरिटाइम क्षेत्रात महिलांची संख्या ०.६९ टक्क्यांहून कमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला या क्षेत्राकडे वळाव्यात, यासाठी प्रयत्नशील राहीन. त्याशिवाय कामगारांचे 
प्रलंबित प्रश्न वरिष्ठ पातळीवर मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन.
- कल्पना देसाई, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगार विश्वस्त

दत्ता खेसे यांचीही निवड
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागात शेड सुप्रिटेंडेंट म्हणून कार्यरत असलेले दत्ता खेसे यांचीही कामगार विश्वस्तपदी निवड झाली आहे. १९८७ साली टॅली क्लार्क म्हणून ते पोर्ट ट्रस्टच्या सेवेत रुजू झाले. गोदी कामगारांबरोबरच असंघटित क्षेत्रातील जहाज तोडणी कामगार व चालक-मालक तंत्रज्ञ कामगारांसाठी त्यांनी चळवळ उभारली. विश्वस्तपद हे आव्हानात्मक असून, कामगारांचे प्रश्न पोटतिडकीने मांडण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग    करीन, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना       व्यक्त केली.

Web Title: Women as trustees of Mumbai Port Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.